विद्यापीठातील हाणामारी प्रकरणात कारवाई केव्हा? काही विशिष्ट संघटनांना कुलगुरू पाठीशी घालत असल्याचा आराेप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 09:45 AM2023-11-09T09:45:23+5:302023-11-09T09:46:02+5:30

कुलगुरूंच्या निष्क्रियतेमुळे विद्यापीठात भीतीचे वातावरण निर्माण हाेत असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू

When will the action be taken in the university brawl case? Allegation that the Vice-Chancellor is supporting certain organizations | विद्यापीठातील हाणामारी प्रकरणात कारवाई केव्हा? काही विशिष्ट संघटनांना कुलगुरू पाठीशी घालत असल्याचा आराेप

विद्यापीठातील हाणामारी प्रकरणात कारवाई केव्हा? काही विशिष्ट संघटनांना कुलगुरू पाठीशी घालत असल्याचा आराेप

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हिंसाचाराच्या घटनेस एक आठवड्याचा कालावधी उलटला. मात्र, कुलगुरू डाॅ. सुरेश गाेसावी यांनी मारहाण करणाऱ्यांबाबत अद्याप ठाेस भूमिका घेतलेली नाही. विद्यापीठात वारंवार हिंसक घटना घडल्यानंतरही काही विशिष्ट संघटनांना कुलगुरू पाठीशी घालत आहेत. कुलगुरूंच्या निष्क्रियतेमुळे विद्यापीठात भीतीचे वातावरण निर्माण हाेत असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.

पुराेगामी विद्यार्थी कृती समितीतर्फे बुधवार, दि. ८ राेजी शांतता मार्चचे आयाेजन केले हाेते. मात्र, जमावबंदीचा आदेश लागू केल्याने आंदाेलन न करता समितीतील साेमनाथ निर्मळ आणि बी. युवराज यांनी कुलगुरूंची भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले. त्यामध्ये दि. १ नोव्हेंबर व ३ नोव्हेंबर रोजी अभाविप, भाजपने विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्यांबाबत विद्यापीठाने काय कारवाई केली, हे स्पष्ट करावे तसेच यापूर्वीही अभाविपने विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाची तोडफोड करणे यांसारखे प्रकार केले आहेत. या सर्व कृत्यांबाबत विद्यापीठाने आजवर केलेल्या कारवाईचा अहवाल जाहीर करावा, अशी मागणी केली.

कार्यक्रमास बंदीबाबत दिवाळीनंतर बैठक

यासाेबतच विद्यापीठात विद्यार्थ्यांनी कार्यक्रम घेण्यास बंदी घालणारे परिपत्रक मागे घ्यावे. विद्यार्थ्यांच्या लोकशाही अधिकारांचे संवर्धन करणे, शैक्षणिक निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींसह समिती स्थापन केली जावी, इत्यादी मागण्या करण्यात आल्या. त्यावर दिवाळीनंतर बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरूंनी दिल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले.

विद्यापीठाला लष्करी छावणीचे रूप

विद्यापीठात हाेत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतर पुराेगामी विद्यार्थी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी आंदाेलनाचा इशारा दिल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला जाग आली. दरम्यान, विद्यापीठात शेकडो पोलिस, सुरक्षारक्षक तैनात केले असून, पोलिस छावणीचे रूप आले आहे. मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची कसून चाैकशी सुरू आहे. एक प्रकारे विद्यापीठ प्रशासन आता ‘वरातीमागून घाेडे’ नाचवत असल्याचे बाेलले जात आहे.

पाेलिसांचे हातावर घडी ताेंडावर बाेट

दि. १ नाेव्हेंबर राेजी झालेल्या हिंसाचाराच्या चित्रफिती समाजमाध्यमावर व्हायरल झाल्या आहेत. त्यामध्ये एसएफआय सभासद नाेंदणीच्या ठिकाणी पाच ते सहा जणांचे टाेळके जाणीवपूर्वक काही विद्यार्थ्यांना घेरून मारहाण करीत असल्याचे दिसून येत आहे. तरीही चतु:शृंगी पाेलिसांनी तपास करीत अद्याप काेणासही ताब्यात घेतले नाही. तसेच दि. ३ राेजी भाजप आंदाेलनादरम्यान घडलेल्या प्रकाराबाबत पाेलिसांनी काेणतीही कारवाई केली नाही. केवळ तपास सुरू असल्याचे माेघम उत्तर दिले जात असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले.

Web Title: When will the action be taken in the university brawl case? Allegation that the Vice-Chancellor is supporting certain organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.