‘मुलीशी तुझा संबंध काय आहे, तू का मध्ये पडतो', मित्रांनी केला घात, पार्कमध्ये बोलावून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 14:18 IST2025-12-09T14:18:03+5:302025-12-09T14:18:34+5:30
एका अल्पवयीन मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधातून दोघांमध्ये वाद झाला होता, त्यावेळी त्याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून खून केला

‘मुलीशी तुझा संबंध काय आहे, तू का मध्ये पडतो', मित्रांनी केला घात, पार्कमध्ये बोलावून खून
पुणे: चंदननगर भागातील ऑक्सिजन पार्क येथे शनिवारी (दि. ६) सायंकाळी झालेल्या युवकाच्या खून प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली. या प्रकरणी एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासात युवकाचा खून प्रेमसंबंधातील वादातून झाल्याचे उघडकीस आले आहे.
लखन बाळू सकट (१८, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी प्रथमेश शंकर दारकू (२०), यश रवींद्र गायकवाड (१९), जानकीराम परशराम वाघमारे (१८), महादेव पांडुरंग गंगासागरे (१९), बालाजी आनंद पेदापुरे (१९, सर्व रा. बोराटे वस्ती, चंदननगर) आणि करण निवृत्ती सरवदे (१८, रा. गणेशनगर, वडगाव शेरी) यांना अटक करण्यात आली. लखन याचे काका केशव बबन वाघमारे (३२, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांनी याबाबत चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधातून लखन सकट आणि आरोपी यश गायकवाड यांच्यात वाद झाला होता. शनिवारी (दि. ६) सायंकाळी सातच्या सुमारास आरोपी यशने लखनला चंदननगरमधील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क परिसरात बोलवून घेतले.
लखन मित्रासाेबत तेथे आला असता यश गायकवाडने ‘‘मुलीशी तुझा संबंध काय आहे. तू का मध्ये पडतो,’’ अशी विचारणा केली. त्यानंतर यश आणि लखन यांच्यात पुन्हा वाद झाला. यश आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी लखनला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. लखनवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या लखनला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पसार झालेल्या सहा आरोपींना रात्री उशिरा अटक करण्यात आली, तर पाच अल्पवयीनांना रात्री ताब्यात घेण्यात आले.