श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर रांगेत दागिने चोरले; महिलेसह दोघांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 12:16 IST2025-05-06T12:16:43+5:302025-05-06T12:16:52+5:30
गर्दीचा फायदा घेऊन आरोपींनी तक्रारदार महिलेच्या मुलीच्या गळ्यातील ४० हजारांची सोन्याची चैन काढून घेत चोरी केली

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर रांगेत दागिने चोरले; महिलेसह दोघांना बेड्या
पुणे: शहरातील मध्यवर्ती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन रांगेत थांबलेल्या महिला भाविकांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना ४ एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. माधुरी संतोष डुकरे-घाडगे (३०, रा. यवत, दौंड) आणि काव्य तनवीर जाधव (२१) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला इंदापूर तालुक्यातील विठ्ठलवाडीत राहणारी आहे. ४ एप्रिलला दुपारी तीनच्या सुमारास तक्रारदार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन रांगेत थांबली होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन आरोपी माधुरी आणि काव्यने तक्रारदार महिलेच्या मुलीच्या गळ्यातील ४० हजारांची सोन्याची चैन काढून घेत चोरी केली. या प्रकरणी एका महिलेसह चोरटा दिसून आल्यामुळे तिने आरडाओरड केली. त्यानंतर भाविकांसह सुरक्षारक्षकांनी चोरट्यांना पकडून विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पोलिस अंमलदार काटे पुढील तपास करीत आहेत.