'२ दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाबद्दल आम्हाला सांगितलं असतं तर', मृत विद्यार्थ्याच्या वडिलांचे क्लासचालकांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 16:16 IST2025-12-15T16:15:44+5:302025-12-15T16:16:35+5:30
क्लास चालकांनी त्यांची भांडण होऊनही दोघांना एकाच बाकावर बसवलं होत, त्यामुळे हा हत्येचा भयानक प्रकार घडला

'२ दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाबद्दल आम्हाला सांगितलं असतं तर', मृत विद्यार्थ्याच्या वडिलांचे क्लासचालकांवर गंभीर आरोप
पुणे : राजगुरुनगर शहरात एक धक्कादायक घटना घडली. दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर त्याच वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याने चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेला पुष्कर दिलीप शिंगाडे विद्यार्थी जागीच मृत पावला आहे. या घटनेबाबत पुष्करच्या वडिलांनी संताप व्यक्त करत क्लास चालकांवर गंभीर आरोप केले. दोघांमध्ये आधीपासून वाद होते. त्याची माहिती क्लासचालकांनी पालकांना दिली नव्हती. जर क्लास चालकांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाबद्दल आम्हाला सांगितलं असतं तर आज माझा मुलगा जिवंत असता. असं म्हणत पुष्करच्या वडिलांनी क्लासचालकांवर गंभीर आरोप केले आहेत.
एकाच बाकावर बसवले
दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये ३ महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. पुष्कर आणि प्रयाग यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी पुन्हा भांडण झाले. दोघांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली होती. या घटनेची माहिती क्लास चालकांनी पालकांना दिली नाही. उलट दोघांनाही एकाच बाकावर बसवलं गेलं आणि त्यातूनच पुन्हा वाद होऊन भयानक हत्येचा प्रकार घडला.
स्वतः गुन्ह्याची कबुली दिली
दोन्ही विद्यार्थी एकाच शाळेत शिकत आहेत. किरकोळ वादातून हा प्रकार घडला होता. हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याने चाकूने सपासप वार केले, ज्यामुळे जखमी पुष्करला गंभीर इजा झाल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्ला करणारा विद्यार्थी आणि त्याच्या साथीदाराने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली. दोन्ही अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुष्करला तातडीने चांडोली रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.