...त्या ठिकाणी स्वतंत्र लढू आणि निवडणुकीनंतर एकत्र येऊ; मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 17:28 IST2025-05-15T17:26:47+5:302025-05-15T17:28:00+5:30

ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे, त्या ठिकाणी मित्रपक्षाला जास्त जागा सोडता येणार नाहीत

we will come together after the elections Chief Minister devendra Fadnavis hints at contesting independently | ...त्या ठिकाणी स्वतंत्र लढू आणि निवडणुकीनंतर एकत्र येऊ; मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

...त्या ठिकाणी स्वतंत्र लढू आणि निवडणुकीनंतर एकत्र येऊ; मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. मात्र, हि निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे, त्या ठिकाणी मित्रपक्षाला जास्त जागा सोडता येणार नाहीत. त्यामुळे शक्य तिथे महायुती करून अपवादात्मक ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढू, आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्रित येवू, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.

राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्या यशदा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेस मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी भेट दिली. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १२० दिवसात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक घेण्यात मला अडचण वाटत नाही. निवडणुक आयोगाने तयारी सुरू केली आहे. आम्ही वेळेत निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू. ज्या भागात पाऊस जास्त असेल त्या भागातील निवडणुका थोड्या पुढे ढकलण्याची विनंती आम्ही निवडणूक आयोगाला करू. पण वेळेत निवडणुका पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहिल.

महापालिकांच्या निवडणूका स्वबळावर लढणार की महायुतीच्या माध्यमातून, या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्हाला महापालिकांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. आम्ही तिन्ही पक्ष एकच आहोत. मात्र, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्ते पाच पाच, सात सात वर्ष काम करतात, त्यांना निवडणूक लढवावी, असे वाटणे सहाजिकच आहे. ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे, त्या ठिकाणी मित्र पक्षाला जास्त जागा सोडता येणार नाहीत. त्यामुळे शक्य तिथे महायुती करून अपवादात्मक ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढू, आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्रित येवू. अपवादात्मक ठिकाणी जेथे स्वतंत्र निवडणूक लढू, तेथे एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचार करू. मात्र, जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

शासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी कार्यशाळा

राज्यात नवीन सरकार आल्यानंतर आम्ही प्रशासकीय सुधार, ई गव्हर्रनचा वापर आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासठी संवाद आणि कार्यशाळांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विविध गट तयार करून एका एका गटासोबत मी चर्चा करत आहे. त्यांच्या अडचणी काय आहेत. आमच्या अपेक्षा काय आहेत, यावर नवीन काय करता येईल, याचा एकत्रीत विचार करत आहोत. यासाठी १५० दिवसांचा कार्यक्रमाचा दिला आहे. अनेक लोक चांगले काम करत आहेत. ते जोपर्यंत पदावर असतात, तोवर ते काम राहते, ते बदलल्यानंतर व नवीन कोणी आल्यावर त्यात बदल होते. असे न होण्यासाठी संस्थात्मक बांधणी करायची आहे, त्यासाठी या कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. यानंतरही कार्यशाळा होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Web Title: we will come together after the elections Chief Minister devendra Fadnavis hints at contesting independently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.