Pune Water Crisis: पुण्यात पाणीटंचाईचा भडका..! संतप्त उद्धवसेनेने क्षेत्रीय कार्यालयावर हांडे फेकत केले आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 11:04 IST2025-01-31T10:57:24+5:302025-01-31T11:04:41+5:30
Pune Water Crisis: पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास शिवसेना जनतेचे हितासाठी प्रशासनास नक्की पाणी पाजेल, असा इशारा उद्धवसेनेने दिला

Pune Water Crisis: पुण्यात पाणीटंचाईचा भडका..! संतप्त उद्धवसेनेने क्षेत्रीय कार्यालयावर हांडे फेकत केले आंदोलन
Pune Water Crisis: भवानी पेठ, गुरुवार पेठ, नाना पेठ या भागाला गेल्या १५ दिवसांपासून पाणी मिळत नाही. त्यामुळे उद्धवसेनेच्या वतीने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयावर पाण्यासाठी हांडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त नागरिकांनी या क्षेत्रीय कार्यालयावर हांडे फेकले. या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास शिवसेना जनतेचे हितासाठी प्रशासनास नक्की पाणी पाजेल, असा इशारा उद्धवसेनेने दिला आहे.
उद्धवसेनेचे पुण्याचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, जावेद खान, चंदन सांळुखे, रूपेश पवार आदी यामध्ये सहभागी झाले होते. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत महापालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्यामुळे या भागातील नागरिक गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्याविना बेजार झाले आहेत. नागरिकांची गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी वणवण सुरू आहे. नागरिकांना जबाबदार अधिकारी वर्गाकडून योग्य सहकारी मिळत नाही.
यामध्ये ठेकेदार हातवर करून प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत आहे. त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आंदोलनाच्या पवित्रानंतर प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी केली असून अजूनही पाणी गळती सुरू आहे या भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. महापालिका प्रशासन आणि ठेकेदार गेले पंधरा दिवस उलटूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे आंदोलन करण्यात आले.