पाण्याच्या टंचाईने होरपळ; खडकवासला धरणासाठी जमिनी गमावलेल्या गावकऱ्यांचाच पाण्यासाठी संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 10:17 IST2025-05-08T10:16:43+5:302025-05-08T10:17:04+5:30
खडकवासला धरणाच्या अगदी जवळ असलेली कोंढवे धावडे, कोपरे, शिवणे, उत्तमनगर ही गावे आज पाण्यासाठी वणवण करीत आहेत

पाण्याच्या टंचाईने होरपळ; खडकवासला धरणासाठी जमिनी गमावलेल्या गावकऱ्यांचाच पाण्यासाठी संघर्ष
शिवणे : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून तसे पाण्याची टंचाईही गंभीर रूप धारण करत आहे. विशेष म्हणजे संपूर्ण पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या अगदी जवळ असलेली कोंढवे धावडे, कोपरे, शिवणे, उत्तमनगर ही गावे आज पाण्यासाठी वणवण करीत आहेत. धरणासाठी जमिनी गमावलेल्या या गावकऱ्यांना स्वतःच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ही बाब खेदजनक असून संतापजनक देखील आहे.
या भागातील काही गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाण्याची स्थिती बिकट झाली आहे की नागरिकांना पाण्याच्या टँकरसाठी लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. विशेषतः महिलांवर याचा मोठा ताण पडत असून त्यांना घरगुती कामांसाठी दररोज पाण्यासाठी झगडावे लागत आहे. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामीण अध्यक्ष त्रिंबक मोकाशी आणि माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे यांनी पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी चर्चा केली. यावेळी विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, संतोष लांजेवार, अभियंता रोहन कापसे यांच्यासह अन्य संबंधित कर्मचारी उपस्थित होते. चर्चेदरम्यान, या भागात मोठ्या क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्याची पाहणीही करण्यात आली. यासोबतच, सध्या निर्माण झालेली पाण्याची टंचाई तात्पुरत्या स्वरूपात कशी मिटवता येईल. यावर सकारात्मक चर्चा झाली. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पाण्याच्या या टंचाईमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी असून त्यांनी प्रशासनाकडून स्थायी आणि विश्वासार्ह उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. धरणाजवळ असूनही पाण्याला पारखे होणाऱ्या गावकऱ्यांचा आवाज ऐकण्याची वेळ आता आली आहे.