पुणे: पुण्याच्या पाण्याची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांना कसलीच माहिती नाही, त्यामुळेच विनाकारण त्यांनी पुणेकरांवर शिंतोडे उडवले. ते ज्या पक्षात आहेत, त्या भारतीय जनता पक्षाचा महापालिकेतील कारभारच पुणेकरांना पाण्यापासून वंचित करायला कारणीभूत आहे, अशी टीका शिवसेनेने केली. विखे यांनी अलीकडेच पुण्यातील एका कार्यशाळेनंतर पत्रकारांबरोबर बोलताना पुण्याच्या पाण्यावरून पुणेकरांवर टीका केली होती.
शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी यावरून विखे यांच्यावर टीका केली. शहरात टाऊनशीपचे मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. ठराविक लोकांचीच घरे यातून भरली जात आहेत. बांधकाम व्यावसायिक सर्वसामान्य पुणेकरांचे पाणी पळवतात. कृष्णा लवादानुसार नवे धरण बांधता येत नाही, याची मंत्री विखे यांनाच माहिती नाही. पाण्याविषयी सरकारकडेच कसले धोरण नाही. इथे पुण्यात सरकारने फार मोठ्या प्रमाणावर टीडीआर एफएसआयची खैरात केली आहे. त्यामुळेच शहरातील नागरी सुविधांवर ताण येत आहे, असे मोरे म्हणाले.
पुणेकरांनी भाजपला राजकीय यश दिले, त्याचा वापर पुण्याचा विकास करण्याऐवजी भाजपच्या पुण्यातील पुढाऱ्यांनी स्वत:चा विकास करून घेतला. त्याचा सगळा वेळ आपल्या गोठ्यात इतरांचे लोकप्रतिनिधी आणून कसे ठेवता येतील यातच चालला आहे. या सर्व अंदाधुंदीला राज्यातील व महापालिकेतील भाजपची सत्ताच कारणीभूत असल्याची टीका मोरे यांनी केली.