सोलापूरसाठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग; शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:54 IST2025-04-07T15:53:55+5:302025-04-07T15:54:13+5:30
उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडताना दिसून येत आहे

सोलापूरसाठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग; शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार?
बाभुळगाव: भीमा नदीवरील पिण्याचे पाणी आवर्तन उद्या मंगळवारी (दि.८) सकाळी ९ वाजता उजनी धरण विद्युतगृह मधून सुरुवातीस १६०० क्युसेक इतका विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात येणार असून आवश्यकतेनुसार विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करून ६००० क्युसेक करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता रा. पो. मोरे उजनी धरण व्यवस्थापन विभाग भिमानगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उजनी धरणातून उन्हाळी हंगामातील सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगरपरिषद व भीमा नदीकाठच्या ग्रामपंचायतीच्या पिण्याचे पाणी योजनांसाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे. असे भीमा नदी काठच्या नागरीकांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे सुचित करण्यात आले आहे. सद्या उजनी धरणातून सीना-माढा योजना ३३३ क्युसेक, दहिगाव १२० क्युसेक, बोगदा ८१० क्युसेक व मुख्य कालवा २९५० क्युसेक असा विसर्ग सुरू आहे.
आगामी काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार
तुर्तास तरी भीमा नदी काठच्या नागरिकांची चिंता मिटली असली तरी उजनी धरणातील पाणी स्थिती पाहता आगामी काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसत असल्याचे नदीकाठच्या शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. तसेच उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडताना दिसून येत आहे.