आंबेगाव पठार परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर; पाण्यासाठी महापालिकेवर महिलांचा हंडा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 10:01 IST2025-04-05T10:01:34+5:302025-04-05T10:01:47+5:30
पाणीच मिळत नसल्याने नागरिकांना उन्हा-तान्हात पाण्यासाठी पायपीट कारवाई लागत आहे

आंबेगाव पठार परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर; पाण्यासाठी महापालिकेवर महिलांचा हंडा मोर्चा
पुणे: आंबेगाव पठार परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे, अनेक ठिकाणी पाणी येतच नाही, तर काही ठिकाणी कमी वेळ व कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी महिला मंडळींनी महापालिकेवर हंडी मोर्चा काढला. यावेळी महिलांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत पाणीपुरवठ्यात सुधारणा न केल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालून तीव्र आंदाेलन करू, असा इशाराही दिला.
आंबेगाव पठार परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या ठिकाणी महापालिकेच्या नळांना पाणी येण्याची काही वेळ नाही. पाणी आलेच तर फक्त काही मिनिटांसाठी येते. काही ठिकाणी नागरिकांना टँकर विकत घेऊन पाण्याची व्यवस्था करावी लागते. काही भागांत तर पाणीच मिळत नसल्याने नागरिकांना उन्हा-तान्हात पाण्यासाठी पायपीट कारवाई लागत आहे. त्यामुळे येथील महिलांनी शुक्रवारी पालिकेवर हंडा मोर्चा काढला. यावेळी महिलांनी पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.