पुण्यात 'पाणी' तापले :मनसेने तोडले सिंचन भवनाचे पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 16:42 IST2019-01-17T16:40:15+5:302019-01-17T16:42:45+5:30
जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या वादात पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे, याच्या निषेधार्थ गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सिंचन भवन येथे आंदोलन करण्यात आले.

पुण्यात 'पाणी' तापले :मनसेने तोडले सिंचन भवनाचे पाणी
पुणे: जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या वादात पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे, याच्या निषेधार्थ गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सिंचन भवन येथे आंदोलन करण्यात आले. तसेच सिंचन भवनातील अधिकाऱ्यांचे पाणीमनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडले.
जलसंपदा विभागाच्या वतीने बुधवारी दुपारी तीन वाजता पालिकेला पाणीपुरवठा करणारे दोन पंप बंद करण्यात आले. कोणतीही पूर्वसूचना न देता सिंचन विभागाकडून पाणी बंद केले जात आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी सिंचन भवन येथे आंदोलन करून सिंचन विभागातील अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा करणारे पाईप तोडून निषेध नोंदवला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय शिंदे म्हणाले,' पुण्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. राज्याचे मुख्यमंत्री पुण्यात येऊन पुणे शहराचे पाणी कमी होणार नाही, असे वक्तव्य करतात. त्यानंतरही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाणी सोडले जाते. जलसंपदा विभागाकडून कायदा सोडून ज्या पद्धतीने कारवाई केली जाते, त्याच पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलनाचे निकष बाजूला ठेवून आंदोलने केली जाणार आहेत'.