प्रांजल खेवलकर यांना अडकविण्यासाठी ‘त्या’ महिलेला तिथे आणले का? खेवलकरांच्या वकिलांचा कोर्टात सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 20:17 IST2025-07-29T20:16:10+5:302025-07-29T20:17:00+5:30
पिशवीच २ ग्रॅमची, मग २.७० ग्रॅम कोकेन कुठून आलं? संबंधित महिलेला पार्टीला बोलावण्यात आलेले नव्हते. तरी ती कशी आली?

प्रांजल खेवलकर यांना अडकविण्यासाठी ‘त्या’ महिलेला तिथे आणले का? खेवलकरांच्या वकिलांचा कोर्टात सवाल
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर पार्टीत ट्रॅप लावला आणि ताब्यात घेतले. पिशवीच २ ग्रॅमची, मग २.७० ग्रॅम कोकेन कुठून आलं? संबंधित महिलेला पार्टीला बोलावण्यात आलेले नव्हते. तरी ती कशी आली? असे अनेक प्रश्न खेवलकर यांच्या वकिलांनी न्यायालयात उपस्थित केले.
दरम्यान, पती खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे या वकिलाचा कोट घालून न्यायालयात आल्या होत्या. खेवलकरसह चार जणांना पोलिस कोठडी तर दोन महिलांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अटकेने खळबळ उडाली. या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्यासह ७ जणांना अटक केली. अटकेत असलेल्या सहा आरोपींची पोलिस कोठडी मंगळवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला की मागील वेळेचा अगदी बरोबर तोच रिमांड रिपोर्ट दिला आहे. रिमांड रिपोर्टमध्ये काय जप्त करायचे आहे, याचा उल्लेख नाही. अमली पदार्थ कोणाच्या बॅगमधून आले? तर ईशा सिंग यांच्या बॅगमधून आले. जे व्हिडिओ व्हायरल केले त्यात सुद्धा दिसत आहे की तिच्या बॅगमधून अमली पदार्थ आहेत. राजकीय व्यक्तीच्या जवळचा माणूस असल्यामुळे आम्हाला पोलिस कोठडी मिळावी? असे म्हणत आहेत. पण प्रांजल खेवलकर यांना न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी मागणी ठोंबरे यांनी केली.
सरकारी वकिलांनी युक्तीवाद केला की, ''पहिल्या दिवसापासून पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. पोलिसांनी सीडीआर सुद्धा मिळवला आहे. त्यात राहुल नावाचा व्यक्ती निष्पन्न झाला आहे. त्याचा नेमका या पार्टी मधील काय सहभाग आहे, हे अजून तपासायचे आहे. त्यामुळे महिलांना न्यायालयीन कोठडी मिळावी व इतर ५ जणांना पोलिस कोठडी मिळावी. तर तपास अधिकारी यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीचे नमुने लॅबमध्ये पाठवले आहेत. राहुल नावाचा व्यक्ती निष्पन्न झाला आहे,तो हुक्का भरत होता. अमली पदार्थ कुठून आणले तर आरोपी एकमेकांचे नाव घेत आहेत. अमली पदार्थाबद्दल माहिती दिलेली नाही.
याप्रकरणात डॉ. प्रांजल खेवलकर (वय 41, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, हडपसर), निखिल जेठानंद पोपटाणी ( वय 35, रा. डीएसके सुंदरबन, माळवाडी), समीर फकीर महंमद सय्यद (वय 41, ऑर्किड सोसायटी, एनआयबीएम रस्ता, कोंढवा), सचिन सोनाजी भोंबे (वय 42, डायमंड पार्क सोसायटी, वाघोली) आणि श्रीपाद मोहन यादव (वय 27, रा. पंचतारा नगर, आकुर्डी) या पाच जणांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. तर, ईशा देवज्योत सिंग (वय 22, रा. कुमार बिर्ला सोसायटी, औंध) आणि प्राची गोपाल शर्मा (वय 23, रा. गोदरेज ग्रीन सोसायटी, म्हाळुंगे) यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.