वेटिंगवरील ग्राहकांना सिलिंडरसाठी प्राधान्य, ३-४ दिवसांत वितरण सुरळीत होणार, पुणे जिल्हा प्रशासनाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 19:28 IST2026-03-21T19:28:16+5:302026-03-21T19:28:37+5:30
गॅसटंचाई निर्माण झाल्यानंतर भीतीपोटी नागरिकांनी सिलिंडर बुकिंगचा धडाका लावला. त्यामुळे वितरणामध्ये मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या

वेटिंगवरील ग्राहकांना सिलिंडरसाठी प्राधान्य, ३-४ दिवसांत वितरण सुरळीत होणार, पुणे जिल्हा प्रशासनाची माहिती
पुणे: युद्धजन्य परिस्थितीत निर्माण झालेल्या गॅसटंचाईमुळे सामान्यांना सिलिंडरचे वितरण सुरळीत व्हावे, यासाठी यापूर्वी बुकिंग केलेल्या ग्राहकांनाच प्राधान्य द्यावे, अशा सक्त सूचना जिल्हा प्रशासनाने गॅस एजन्सींना दिल्या आहेत. त्यामुळे ज्या एजन्सीधारकांकडे अधिकचे बुकिंग आहे, अशांना प्राधान्याने सिलिंडरचे वितरण करण्यात येत आहे. वेटिंगवरील ग्राहकांना प्राधान्याने सिलिंडर देण्यासाठी संबंधित एजन्सींना अधिकचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे मागणी व पुरवठा यातील तफावत पुढील तीन ते चार दिवसात सामान्य होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
गॅसटंचाई निर्माण झाल्यानंतर भीतीपोटी नागरिकांनी सिलिंडर बुकिंगचा धडाका लावला. त्यामुळे वितरणामध्ये मोठ्या समस्या निर्माण झाल्या. अनेक ठिकाणी नागरिकांनी सिलिंडरसाठी रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे प्रत्यक्ष मागणी व पुरवठा यात मोठा फरक दिसून आला. यावर उपाययोजना होऊन जिल्हा प्रशासनाने सिलिंडरचे बुकिंग ऑनलाइन केल्यानंतर येणाऱ्या ओटीपीवरच सिलिंडरचे वितरण करण्याचे निर्देश एजन्सीधारकांना दिले. परिणामी गेल्या पाच दिवसांपासून सिलिंडरच्या वितरणात सुरळीतपणा आला आहे. जिल्ह्यातील एजन्सींसमोर लागणाऱ्या रांगा बंद झाल्या असून, ग्राहकांना आता घरपोच सिलिंडर मिळत आहेत. गॅस कंपन्यांनीदेखील ज्या एजन्सीधारकांकडून सर्वाधिक बुकिंग आले आहे, अशा गॅस एजन्सींना ज्यादा पुरवठा करण्याचे ठरविले आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी ७३,४१९ गॅस सिलिंडरचे बुकिंग करण्यात आले होते, तर कंपन्यांकडून ९१,१९४ सिलिंडरचे एजन्सींना वितरण करण्यात आले. तर एजन्सींकडून प्रत्यक्ष ग्राहकांना ८०,७०८ सिलिंडरचे वितरण झाले. त्यामुळे मागणीपेक्षा सुमारे साडेसहा हजार अधिक सिलिंडर देण्यात आले आहेत. यात जुन्या बुकिंगचा समावेश आहे. पुढील तीन ते चार दिवसांत वेटिंगवरील सर्व ग्राहकांना सिलिंडरचे वितरण करण्यात येईल व त्यानंतर मागणीनुसार संपूर्ण पुरवठा त्या त्या दिवशी सुरळीत होईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली.
दरम्यान, काही एजन्सीधारकांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या ९६ तासांच्या आत वितरणाच्या अटीबाबत नाराजी व्यक्त केली. या कालावधीत सिलिंडर पुरवणे अवघड असल्याचे या एजन्सीधारकांचे म्हणणे आहे. मात्र, घरपोच वितरणाची व्यवस्था असलेल्या एजन्सीधारकांना या स्वरूपाची अडचण आलेली नाही. त्यामुळे वितरणाची व्यवस्था नसलेल्या एजन्सींनी ती तातडीने करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आल्याचे सुधळकर यांनी स्पष्ट केले.