Pune Ganeshotsav: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंडळांचे स्वयंसेवक सज्ज; विसर्जनावेळी प्रमुख चौकांमध्ये टायमर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 15:16 IST2024-08-18T15:16:01+5:302024-08-18T15:16:20+5:30
विसर्जन मिरवणूक वेळेत संपावी, दोन गणेश मंडळांच्या मिरवणुकीत अंतर राहू नये यासाठी प्रमुख चौकांमध्ये डिजिटल टायमर

Pune Ganeshotsav: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंडळांचे स्वयंसेवक सज्ज; विसर्जनावेळी प्रमुख चौकांमध्ये टायमर
पुणे : शहरातील गणेशोत्सव म्हणजे गणेशभक्तांसाठी मोठी पर्वणी असते. राज्यासह देशातील कानाकोपऱ्यांतून पुण्यातील गणेशोत्सव बघायला भाविक येत असतात. यावेळी होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी गणेश मंडळांचे स्वयंसेवक पोलिसांना मदत करणार असल्याचे आश्वासन पोलिसांना गणेश मंडळांकडून देण्यात आले आहे.
परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी गणेश मंडळांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. पोलिसांनी ‘एमएसईबी’सोबत देखील चर्चा केली असून, रस्त्यावर खाली आलेल्या वायरवर करण्यासंदर्भात त्यांनादेखील सूचना देण्यात आल्या आहेत. गणेश मंडळ, ढोल पथक, पोलीस, स्वयंसेवक यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याचे मत पोलिसांनी नोंदवत शहरातील अनेक गणेश मंडळांसाठी नोडल ऑफिसरची देखील नेमणूक करण्यात येणार असल्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.
विसर्जन मिरवणुकीवेळी प्रमुख चौकांमध्ये टायमर...
विसर्जन मिरवणूक वेळेत संपावी, दोन गणेश मंडळांच्या मिरवणुकीत अंतर राहू नये यासाठी प्रमुख चौकांमध्ये डिजिटल टायमर बसवण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच गणेश मंडळांनी सामाजिक संदेश देणारे देखावे, पोस्टर (उदा. ड्रग्ज, सोशल मीडियाचा चुकीचा वापर, अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये.) तयार करावेत, अशी चर्चा देखील यावेळी करण्यात आली.