युपीतील सपाच्या माजी आमदाराच्या मुलाला सामूहिक बलात्कार प्रकरणात पुण्यातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 08:06 IST2022-07-26T08:01:04+5:302022-07-26T08:06:37+5:30

आरोपीची माहिती कळविणाऱ्यास उत्तरप्रदेश पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते...

vishnu mishra Son of former SP MLA from UP vijay mishra arrested in gang rape case from Pune | युपीतील सपाच्या माजी आमदाराच्या मुलाला सामूहिक बलात्कार प्रकरणात पुण्यातून अटक

युपीतील सपाच्या माजी आमदाराच्या मुलाला सामूहिक बलात्कार प्रकरणात पुण्यातून अटक

पुणे:उत्तर प्रदेशात एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या समाजवादी पक्षाच्या माजी आमदाराच्या मुलाला वाराणसी तसेच हडपसर पोलिसांनी अटक केली. आरोपी हडपसर भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहायला होता. पसार झालेल्या आरोपीची माहिती कळविणाऱ्यास उत्तरप्रदेश पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

विष्णू मिश्रा (वय ३४, रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विष्णू मिश्रा याचे वडील विजय मिश्रा हे उत्तरप्रदेशातील भदोईचे आमदार होते. सामूहिक बलात्कार प्रकरणात मिश्रा सामील असल्याचे तपासात उघडकीस आले होते. चार वेळा आमदार राहिलेले विजय मिश्रा यांना २०२० मध्ये मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मुलगा विष्णू मिश्रा हा पसार झाला होता. त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसही काढली होती. उत्तरप्रदेश पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. तपासादरम्यान मिश्राचे नातेवाईक पुण्यात राहत असल्याची माहिती विशेष तपास पथकाला मिळाली होती.

त्यानंतर हडपसर पोलिसांच्या मदतीने पोलीस पथकाने मिश्रा याला अटक केली. त्याला लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीच्या वतीने अॅड. प्रताप परदेशी, अॅड. अभिजीत खांडरे आणि अॅड. मजहर मुजावर यांनी बाजू मांडताना, आरोपीला ट्रान्झिट दरम्यान एस.टी.एफ. यांचेकडून बनावट एन्काउंटरमध्ये जीवे मारून टाकण्याची भीती आहे. त्याला उत्तर प्रदेशातील न्यायालयासमोर हजर करेपर्यंत जास्तीत जास्त सुरक्षा पुरविण्यात यावी व न्यायालयाने त्याची खातरजमा करावी, अशी मागणी केली. स्पेशल टास्क फोर्स यांनी सुरक्षिततेत उत्तर प्रदेश येथील न्यायालयात २९ जुलैपर्यंत हजर करण्याचे आदेश दिले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, निखिल पवार, भगवान हंबर्डे, सोनवणे तसेच वाराणसी पथकातील सहायक आयुक्त शैलेश सिंग, श्रीवास्तव, अंगद यादव, राहुल सिंग यांनी ही कारवाई केली.

Web Title: vishnu mishra Son of former SP MLA from UP vijay mishra arrested in gang rape case from Pune