शिवसंग्राम विधानसभेच्या ५ जागा लढवणार; ज्योती मेटे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात, बीड मधून चाचपणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 16:10 IST2024-08-18T16:07:43+5:302024-08-18T16:10:50+5:30
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आम्ही महाविकास आघाडी कि महायुती यांच्यासोबत जाण्याचे ठरवणार

शिवसंग्राम विधानसभेच्या ५ जागा लढवणार; ज्योती मेटे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात, बीड मधून चाचपणी सुरू
पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे. महायुती अन् महाविकास आघाडीबरोबरच मनसे, वंचित बहुजन आघाडी, व इतर घटक पक्षही या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीसुद्धा सरकारला अल्टिमेटम देत विधानसभा लढविण्याचे संकेत दिले आहेत. अशातच शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पत्नी ज्योती मेटेही (Jyoti Mete) स्वतः विधानसभा लढवणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
पुण्यात आज शिवसंग्राम पक्षाची (Shiv Sangram Party) सर्वसाधारण सभा पार पडली. सभेत शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्ष म्हणून ज्योती मेटे यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील सर्व सभासद या सभेला उपस्थित होते. आगामी काळातील राजकीय भूमिका काय यावर चर्चा झाली. तसेच नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
मेटे म्हणाल्या, शिवाजी महाराज स्मारक आणि मराठा आरक्षण यावर सभेत चर्चा झाली असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आणि कायदेशीर मराठा आरक्षण हे कोणी देईल. आम्ही त्यांच्यासोबत जाणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांशी आमची चर्चा सुरू आहे. या विधानसभेला शिवसंग्राम किमान ५ विधानसभा जागा लढवणार आहे. मुंबई, कोकण. विदर्भ मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र पाच विभागात पाच जागा पाहिजेत. मी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून सध्या बीड मधून चाचपणी सुरू आहे. आम्हाला निवडणुका ज्या ठिकाणी जिंकेल असं वाटत त्याच ठिकाणी आम्ही लढवणार आहोत.
ओबीसीतून आरक्षण मिळावे हीच मेटेंची मागणी
आरक्षण मुद्द्यावर सरकारने सर्वपक्षीय बैठकीला बोलावलं तर आम्ही जाऊ. आम्हाला बोलावलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. कारण मेटे साहेब आरक्षणासाठी अनेक वर्ष लढत होते. त्यामुळे आम्हाला बोलावलं पाहिजे. जाती आणि समाजाचा निर्णय नाही तर मानसिकतेचा मुद्दा आहे. मेटे यांची पण ओबीसी मधून आरक्षणाची मागणी होती. आजही ओबीसी मधून आरक्षण मागणी आहे. समाजाचे हित लक्षात घेऊन मराठा आरक्षण मागणी जरांगे पाटील करत आहे. मन दुभंगले नाही पाहिजे याची काळजी सरकारने घ्यायला हवी.