७ गावांतील ग्रामस्थ पुरंदर विमानतळाविरोधात आक्रमक, ४ एप्रिलपासून बसणार उपोषणास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 10:27 IST2025-04-03T10:27:32+5:302025-04-03T10:27:59+5:30
सर्वेक्षण आणि मोजणी व संपूर्ण प्रक्रिया शासन माघारी व रद्द करीत नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे

७ गावांतील ग्रामस्थ पुरंदर विमानतळाविरोधात आक्रमक, ४ एप्रिलपासून बसणार उपोषणास
सासवड : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळासाठी ७ गावांमध्ये भूसंपादन होणार आहे. भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी ३ एप्रिलपासून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीत भूसंपादनाची गरज, प्रकल्पामुळे होणारे बदल, मोबदल्याचे स्वरूप आणि त्याबाबतचे नियम स्पष्ट केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता मौजे पारगाव मेमाणे, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी व उदाचीवाडी या गावांतील ग्रामस्थ आता आक्रमक झाले असून, ४ एप्रिलपासून उपोषणास बसणार आहेत.
शासनाने अन्यायकारक पद्धतीने विमानतळ लादलेले आहे. त्याच्या भूसंपादनासाठी शासन शेतकऱ्यांचा गळा दाबू पाहत आहे. शासनाने सर्वेक्षण आणि भूसंपादन याची प्रक्रिया सुरू केल्याने सामान्य आणि गरीब शेतकरी भयभीत झाले आहेत. लोकप्रतिनिधी, पालकमंत्री व प्रशासन शेतकऱ्यांचा विचार न करता त्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सातही गावांतील शेतकरी हवालदिल झाले असून, गावागावांत झालेल्या बैठकांमधून उपोषण करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. ४ एप्रिलपासून प्रांत अधिकारी व तहसीलदार पुरंदर यांच्या कार्यालयासमोर आम्ही सर्व शेतकरी उपोषण सुरू करीत आहोत. जोपर्यंत सर्वेक्षण आणि मोजणी व संपूर्ण प्रक्रिया शासन माघारी व रद्द करीत नाही, तोपर्यंत आमचे उपोषण सुरू राहणार असल्याचे ग्रामस्थांनी मा. जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदनाद्वारे कळविले आहे.