बिहारमध्ये विजय! नवले पूल दुर्दैवी घटनेमुळे पुणे भाजपचा जल्लोष न करण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:03 IST2025-11-14T16:01:41+5:302025-11-14T16:03:18+5:30
दुर्घटनाग्रस्त नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी पुणे शहर भारतीय जनता पक्षाने बिहार निवडणुकीतील विजयाचा कोणताही सार्वजनिक जल्लोष किंवा उत्सव न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे

बिहारमध्ये विजय! नवले पूल दुर्दैवी घटनेमुळे पुणे भाजपचा जल्लोष न करण्याचा निर्णय
पुणे: बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने उल्लेखनीय विजय मिळविले आहे. पण नवले पुलाजवळ गंभीर अपघाताची घटना घडली. यात सात जणांचा मृत्यू, तर काहीजण जखमी झाले.
या दुर्दैवी घटनेमुळे पुणे शहर हादरले आहे. दुर्घटनाग्रस्त नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी पुणे शहर भारतीय जनता पक्षाने बिहार निवडणुकीतील विजयाचा कोणताही सार्वजनिक जल्लोष किंवा उत्सव न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या वतीने अपघातग्रस्त कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत करण्यात येणार आहे, असे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या आत्म्यास शांती लाभो आणि जखमी नागरिकांनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना करण्यात येत आहे, असे घाटे यांनी सांगितले.
बंगळुरू - पुणे महामार्गावर नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने शहर हादरले. ही संध्याकाळ सात निष्पाप जीवांसाठी 'काळ' ठरली. घटनास्थळी पसरलेला काळोख, वाहनांचे चेंदामेंदा झालेले अवशेष आणि जखमींच्या नातेवाइकांचा हंबरडा हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. दोन कंटेनर आणि एका कारच्या झालेल्या जबरदस्त अपघातात काही क्षणांतच ७ जण जळून खाक झाले, तर तब्बल २० ते २२ जण जखमी झाले. गुरुवारी (दि. १३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कात्रज बोगद्याकडून नवले पुलाकडे येणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या ७ जणांमध्ये एक ५ वर्षांची चिमुकलीही आहे. बाल दिनाच्या पूर्वसंध्येलाच बालिकेचा असा अंत झाल्याने सर्वच पुणेकर हळहळले.