पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहांची सुरक्षा महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ अर्थात ‘मेस्काे’वर साेपवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा विराेध असतानाही विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे विहित प्रक्रिया न करता व्यवस्थापन परिषद सदस्यांनाही याबाबत अंधारात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी ‘लाकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच अधिसभा सदस्यांनी थेट कुलगुरू कार्यालयाला पत्र पाठवून याबाबत खुलासा करण्याची मागणी केली आहे.
याबाबत अधिसभा सदस्य कृष्णा भंडलकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, व्यवस्थापन परिषदेमध्ये ठराव करायचे व परस्पर निविदा प्रक्रिया न राबवता, विहित प्रक्रिया न करता अनेक गोष्टींची खरेदी करणे, नेमणूक करणे अशा पद्धतीच्या गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. त्यातीलच एक प्रकार नुकताच आम्हाला प्रसारमाध्यमातून समजला आहे. ज्यामध्ये ‘मेस्को’चे सुरक्षा कर्मचारी वसतिगृह सहायक या पदावर जास्त वेतन निकषावर तसेच निविदा प्रक्रिया न राबवता घेण्यात आलेले आहेत.
त्या संबंधीचा ठराव व्यवस्थापन परिषदेमध्ये केला; परंतु आर्थिक विषय असल्याकारणाने पहिल्यांदा याची मंजुरी सिनेटमध्ये घेणे जरुरी होते. आपण या कर्मचाऱ्यांना वेतन दिले आणि अधिसभेमध्ये जर हे विषय फेटाळला गेला तर संबंधित कर्मचाऱ्यांना दिलेल्या पगाराची वसुली आपण कोणत्या माध्यमातून करणार आहात. त्यामुळे आपण ही थेट नेमणूक न करता निविदा प्रक्रिया राबवून जी कंपनी अथवा संस्था निवडली जाईल त्यांच्याकडूनच विहित प्रक्रियेमध्ये भरती करण्यात यावी. अन्यथा या विषयांमध्ये माननीय कुलपती महोदय यांच्याकडे तक्रार नोंदवण्यात येईल. कृपया याची आपण दखल घ्यावी, असेही पत्रात म्हटले आहे.
पाठपुरावा करूनही मिळेना उत्तर
निविदा प्रक्रियेतील अनियमितता, परीक्षा विभाग व वित्त विभागातील गैरव्यवहार याबद्दल आपणास वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही काहीच उत्तर मिळत नाही. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्याबराेबरच माझ्यासह काही अधिसभा सदस्य व विद्यार्थी संघटनांनी आत्मक्लेश उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही सदस्य भंडलकर यांनी पत्रात म्हटले आहे. यात त्यांनी इरावती कर्वे संकुलातील सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याच्या ठरावावर कारवाई न करणे, एका विद्यार्थ्याची गैरमार्गाने केलेली गुण वाढ, जादा दराने आणि बेकायदेशीर व्यक्ती व संस्थाकडून खरेदी करणे, पेट परीक्षा मूल्यमापन, पीएच.डी प्रवेश, पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप आदींविषयी प्रश्न उपस्थित केला आहे.
त्या उत्तरपत्रिका गेल्या कुठे?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागात अनियमितता झाली असून, त्याबद्दल कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच उत्तरपत्रिका खरेदी व्यवहारामध्ये काही त्रुटी राहून गेलेल्या आहेत. साधारणपणे ११ कोटींच्या उत्तरपत्रिका यापूर्वीच खरेदी केल्या होत्या. तसेच नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषद बैठकीमध्ये नव्याने सुमारे अडीच कोटी रुपयांचा उत्तर पत्रिका खरेदीचा ठराव मंजूर केलेला आहे. यावर प्रश्न आहे की, अगाेदर खरेदी केलेल्या ११ कोटी रुपयांच्या उत्तरपत्रिकांचे काय झाले? याचाही खुलासा विद्यापीठाने द्यावा. कित्येक कोटी रुपयांच्या उत्तर पत्रिकांचे हिशोबच जुळत नसल्याचे सूत्रांकडून कळले आहे. आपण यावर योग्य ती दखल घ्यावी ही विनंती, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.