ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 09:53 IST2025-05-24T09:53:14+5:302025-05-24T09:53:35+5:30

भारती गोसावी रंगभूमीवर तब्बल ५८ वर्षे अधिराज्य केले असून, ८० मराठी नाटकांमधून सव्वाशेच्या वर भूमिका केल्या आहेत

Veteran actress Bharti Gosavi passes away | ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांचे निधन

पुणे: रंगभूमीवर ५८ वर्षांत ८० मराठी नाटकांमधून सव्वाशेच्या वर भूमिका केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी (वय ८४) यांचे शुक्रवारी (दि. २३) रात्री निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात त्यांची प्राणज्याेत मालवली. शनिवारी दुपारी १२ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. नाट्य अभिनेते बाळ गोसावी यांच्या त्या पत्नी आणि राजा गोसावी यांच्या वहिनी होत.

भारती बाळ गोसावी-माहेरच्या दमयंती कुमठेकर. त्यांचा जन्म २२ जून १९४१ राेजी झाला. आई-वडिलांनाही नाटकाची आवड असल्याने अभिनयाचे बाळकडू घरातच मिळाले. त्याच बळावर त्यांनी रंगभूमीवर तब्बल ५८ वर्षे अधिराज्य केले असून, ८० मराठी नाटकांमधून सव्वाशेच्या वर भूमिका केल्या आहेत. पूर्वी पुण्याच्या भानुविलास थिएटरमध्ये पृथ्वी थिएटर आणि बालगंधर्व यांची नाटके होत. घरी नाटकाचेच वातावरण असल्याचा लाभ घेत भारती यांनी १९५८ मध्येच सौभद्र नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले. शंकर लोहकरे हे त्यांचे पहिले गुरू. पदार्पणातच त्यांना छोटा गंधर्व यांच्याबरोबर काम करायला मिळाले. त्यानंतर भारती गोसावी यांनी मागे वळून पाहिले नाही. संशयकल्लोळ, मानापमान या नाटकांमधून प्रमुख भूमिका केल्या. वेगवेगळ्या नाटकांतून भूमिका करताना भारती गोसावी यांनी अण्णासाहेब किर्लाेस्कर, गोविंद बल्लाळ देवल, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे या दिग्गज नाटककारांची भाषा समर्थपणे पेलली आहे. विविध एकांकिका स्पर्धांत त्या भाग घ्यायच्या. विजया मेहता तेव्हा त्यांच्या प्रतिस्पर्धी हाेत्या.

भारती गोसावी यांचे लग्न नाट्य अभिनेते बाळ गोसावी यांच्याशी झाले. मोठे दीर राजा गोसावी हेही अभिनेते होते. त्यामुळे लग्नानंतरही भारती यांची नाट्य कारकिर्द चालूच राहिली. त्यांनी अत्रे थिएटर्स, कलावैभव, चंद्रलेखा, नाट्यमंदार, पराग आदी नाटक मंडळींच्या नाटकांत कामे केली. काशीनाथ घाणेकर, अविनाश खर्शीकर आदी दिग्गज नायकांबरोबर ‘तुझे आहे तुजपाशी’मध्ये गीताची भूमिका केली. वयाची ७५ आणि रंगभूमीवर ५८ वर्षे पूर्ण केली म्हणून अखिल भारतीय नाट्य परिषद, मनोरंजन (पुणे) व भरत नाट्य संशोधन मंडळ या संस्थांतर्फे २०१६ मध्ये भारती गोसावी यांचा विशेष सत्कार झाला. तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचा २०१५ सालचा चित्तरंजन कोल्हटकर स्मृती पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला हाेता.

गाजलेली पात्रे 

अती शहाणी (योजना), आम्ही रेडिओ घेतो (रंजना), कुणी गोविंद घ्या (प्रतिभा), कुर्यात् पुन्हा टिंगलम् (सूनबाई), कुर्यात् सदा टिंगलम् (सूनबाई - सुनीता देशपांडे, लीला बापट), खट्याळ काळजात घुसली (मिसेस कोटस्थाने), जळो जिणे लाजिरवाणे (सुशीला), तुझे आहे तुजपाशी (गीता), तू वेडा कुंभार (वंचा), दोघांत एक (स्मिता), धन आले माझ्या दारी (अंबिका; अहिल्या), नाही म्हणायचं नाही (आई; राणी), प्रेमा तुझा रंग कसा (बब्बड), बेबंदशाही, मंगळसूत्र, मला तुमची पप्पी द्या, माझा कुणा म्हणू मी (माधवी), मुजरा लोककलेचा (पाटलीणबाई), या सम हा (नटी-सूत्रधार), लग्नाची बेडी (अरुणा; गार्गी; यामिनी; रश्मी), वाहतो ही दूर्वांची जुडी (ताई), मानापमान संशयकल्लोळ (कृत्तिका), सुंदर मी होणार (बेबीराजे), सौभद्र (रुक्मिणी), क्षण एक पुरे प्रेमाचा आदी भूमिका रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ठरल्या आहेत.

Web Title: Veteran actress Bharti Gosavi passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.