The vegetable market started in the market yard, who has been closed for the last 50 days | गेल्या ५० दिवसांपासून बंद असलेला पुण्यातील मार्केटयार्डमधील भाजीपाला बाजार अखेर सुरु

गेल्या ५० दिवसांपासून बंद असलेला पुण्यातील मार्केटयार्डमधील भाजीपाला बाजार अखेर सुरु

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार आवाकामध्ये होणारी प्रचंड गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी खबरदारी

पुणे : कोरोनाच्या संकटामुळे पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केटयार्डमधील गेल्या ५० दिवसांपासून बंद असलेला मुख्य बाजार रविवार (दि.३१) रोजी अखेर सुरु झाला. पहिल्या दिवशी केवळ दहा टक्के मालाची आवक झाली. तसेच शहरामधील अनेक लहान-मोठ्या मंडई सध्या बंद असल्याने शेती मालाला उठाव देखील कमी होतो. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार आवाकामध्ये होणारी प्रचंड गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आली होती.
शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर काही दिवसांतच पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील फुले, भाजीपाला, कांदा-बटाटा आणि फळे विभाग बंद करण्यात आला. त्यानंतर पुन्हा शहरामध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊ लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पुन्हा काही दिवस बाजार सुरु झाला. परंतु मार्केट यार्डालगतच्या झोपडपट्टीमध्येच कोरोनाचे रुग्ण सापडले. या झोपडपट्टीमधील हमाल, कामगार बाजार आवारामध्ये कामासाठी येत असल्याने आडत्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे पुन्हा बाजार बंद करण्यात आला. गेल्या ५० दिवसांपासून हा मुख्य बाजार बंद असल्याने शहरातील नागरिकांची भाजीपाल्याची गरज पूर्ण करण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने शहरालगतच्या उत्तमनगर, मांजरी, मोशी या उपबाजार समित्या सुरु ठेवल्या. तसेच कृषी विभागा मार्फत देखील थेट शेतकरी ते ग्राहक विक्री अशी साखळी विकसित करण्याचा प्रयत्न केला. यामुळे शहरी ग्राहकांची भाजीपाल्याची गरज पूर्ण झाली, पण शेतीमालाची आवक मयार्दीत असल्याने नागरिकांना आजही चढ्या दराने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर रविवार (दि.३१) रोजी गुलटेकडी मार्केट याडार्तील भाजीपाला, कांदा बटाटा आणि फळे विभाग सुरु झाला. शनिवारी रात्री ९ वाजल्यापासूनच बाजार आवारामध्ये शेतकऱ्यांना शेतीमाल घेऊन येण्यास परवानगी देण्यात आली. रविवारी पहाटे चार वाजेपर्यंत सुमारे २०० गाड्या शेतीमालाची आवक झाली. बाजार समिती प्रशासनाला पहिल्या दिवशी किमान ४०० ते ४५० गाड्या शेतीमालाची आवक होईल असा अंदाज होता.
त्यानंतर शहरातील किरोकोळ विक्रेत्यांना शेतीमाल खरेदीसाठी बाजार आवारामध्ये सोडण्यात आले. परंतु सध्या शहरामधील महात्मा फुले मंडई, कॅम्पमधील कुंभार बावडी भाजी मार्केट, हडपसरचे मार्केटसह अन्य सर्व लहान मोठ्या मंडई सध्या बंद आहेत. याशिवाय सर्व हॉटेलस्, मेस आणि मंगल कार्यालय बंद असल्याने शेतीमालाला अपेक्षित उठाव देखील नव्हता. यामुळे सकाळी १०-११ नंतर देखील अनेक आडत्यांच्या गाळयांवर शेतीमाल पडून होता.
--------------------
रविवारच्या तुलनेत दहा टक्केच आवक
गुलटेकडी मार्केट याडार्तील तरकारी विभागात दर रविवारी सरासरी १५०० गाड्या शेतीमालाची आवक होत होती. परंतु कोरोनाच्या संकटामुळे तब्बल दोन महिने बाजार आवार बंद असल्याने रविवारी पहिल्या दिवशी केवळ दहा टक्केच म्हणजे २०० गाड्या शेतीमालाची आवक झाली. सध्या सुरक्षित सामाजिक अंतर राखण्यासाठी एक दिवस पन्नास टक्के आणि दुस-या दिवशी पन्नास टक्के आडत्यांना व्यापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच शेतक-यांना देखील अद्याप मार्केट यार्ड किती प्रमाणात व कसे सुरु होईल याचा अंदाज नसल्याने रविवारी कमी आवक झाली. परंतु येत्या काही दिवसांत नियमित आवक सुरु होईल.
- विलास भुजबळ, अध्यक्ष आडते असोसिएशन मार्केट यार्ड
----------------------
बाजार आवारामध्ये फक्त पास व परवाने असलेल्यांनाच प्रवेश
गुलटेकडी मार्केट यार्डात कोरोनाच्या प्रर्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी केवळ पास असलेल्या व्यक्तींना व परवाने असलेल्या विक्रेत्यांनाचा खरेदीसाठी प्रवेश दिला जाणार आहे. सध्या कोणत्याही प्रकारच्या किरकोळ खरेदी करण्यासाठी नागरिकांना बाजार आवरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच गर्दी कमी ठेवण्यासाठी एका दिवशी पन्नास टक्के आडते व दुस-या दिवशी पन्नास टक्के आडते यांना मालाच्या विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. बाजार आवारातील सर्व प्रवेशद्वारांवर कडक चेकपोस्ट ठेवण्यात आले असून, प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचे थर्मल स्क्रीनिंग, मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत संपूर्ण बाजार आवार सुरळीत सुरु होईल.
-बी.जे.देशमुख, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती
-------------------------------
शहरातील भाजी मंडई सुरु करा
कोरोनामुळे २४ मार्च पासून शहरातील सर्व लहान-मोठ्या भाजी मंडई बंद झाल्या आहेत. शहरातील या भाजी मंडई बंद असताना मुख्य बाजार आवार सुरु केला आहे. परंतु जो पर्यंत या भाजी मंडई सुरु होत नाही तोपर्यंत मुख्य बाजारातील शेतीमालाल उठाव मिळणार नाही. तसेच मुख्य बाजार आवारा प्रमाणे महापालिका प्रशासनाने शहरातील भाजी मंडई सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी.
-संजय शिरसागर, मिलिंद हाके, कुंभार बावडी भाजी मार्केट आडते

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The vegetable market started in the market yard, who has been closed for the last 50 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.