पुण्यात पुढील २ दिवस वरुणराजाचे; विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 13:37 IST2025-10-25T13:37:00+5:302025-10-25T13:37:17+5:30
दुपारी उकाडा आणि रात्री गारवा अशा विचित्र वातावरणाचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे

पुण्यात पुढील २ दिवस वरुणराजाचे; विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज
पुणे: पूर्व मध्य व लगतच्या अग्नेय भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता पूर्व मध्य व अरबी समुद्रावर स्थिर आहे. तसेच दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरावर आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात पावसास सुरुवात झाली असून, पुण्यातही पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पुण्यात पुढील दोन दिवस विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी पावसाने धुव्वा उडविला. भावा-बहिणींचे प्लॅन फिसकटल्याने त्यांच्या आनंदात काहीसे विरजण पडले. शुक्रवारी (दि. २४) सकाळी ९ वाजेपर्यंत पुण्यात १८.3 मि.मी. पावसाची नोंद झाली.
काही दिवसांपूर्वीच नैऋत्य मान्सून राज्यातून परतला आहे. मात्र दिवाळीच्या काळातच पुन्हा पाऊस सुरू झाल्याने पुणेकर वैतागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात ऑक्टोबर हिटचा त्रास जाणवू लागला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. यातच गुरुवारी (दि. २३) भाऊबीजेच्या सायंकाळी अचानक ५ च्या सुमारास जोरदार पावसास सुरुवात झाल्याने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. नवीन कपडे घालून बाहेर पडलेल्या पुणेकरांवर रेनकोट अभावी भिजण्याची वेळ आली. सिंहगड रस्ता, कोंढवा, बिबवेवाडी, कोथरूड अशा उपनगरांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. शुक्रवारीदेखील पावसाच्या जोरदार सरी पडल्या. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. दुपारी उकाडा आणि रात्री गारवा अशा विचित्र वातावरणाचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे.