पुणे : रिक्षाचालक गणेश काळेच्या खुनासाठी वापरलेले पिस्तूल आरोपींनी मध्य प्रदेश-धुळे सीमेवरून आणल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा सूड घेण्यासाठी त्याचा भाचा स्वराज वाडेकरने जानेवारी २०२५ मध्ये अमन शेखला ४५ हजार रुपये रोख दिले होते. या पैशातून अमनने मध्य प्रदेश-धुळे सीमेवरून दोन पिस्तुले, दहा जिवंत काडतुसे व दोन कोयते खरेदी केली. याच शस्त्रांचा वापर करून आरोपींनी अटक आरोपी समीर काळेचा भाऊ गणेश काळेवर गोळ्या झाडून त्याचा खून केला.
या प्रकरणी टोळीप्रमुख कृष्णकांत ऊर्फ कृष्णा बंडू आंदेकर (वय २८), सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर (६९), स्वराज निलंजय वाडेकर (२५, तिघे रा. नाना पेठ) आणि आमीर ऊर्फ चिन्या आसीर खान (२५, रा. कोंढवा) या चौघांना पुणे पोलिसांनी प्रॉडक्शन वॉरंटद्वारे अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांच्यासह चौदा जणांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे; तसेच आरोपींविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश किसन काळे (वय ३०, रा. येवलेवाडी) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. ही घटना एक नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी चारच्या सुमारास खडी मशीन चौकाजवळ घडली होती.
या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच, पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील बरवाना जिल्ह्यातील उमरठी गावात बेकायदा पिस्तुले तयार करणाऱ्या भट्ट्या उद्ध्वस्त करत सातजणांच्या मुसक्या आवळल्या. या आरोपींनीच गणेश काळेच्या खुनासाठी वापरलेली दोन पिस्तुले, काडतुसे आणि कोयत्यांची विक्री केल्याचे तपासात उघड झाले. आंदेकर टोळीच्या सदस्यांनी ही हत्यारे खरेदी करून टोळीप्रमुख कृष्णा आंदेकर व बंडू आंदेकरकडे ठेवण्यासाठी दिली असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
आंदेकर बापलेकासह चौघांना पोलिस कोठडी
वनराजच्या खुनाचा सूड घेण्यासाठी टोळीप्रमुख बंडू व कृष्णा आंदेकर, स्वराज वाडेकर व आमीर खान यांनी गणेश काळेच्या खुनाचा कट रचला. टोळीचे सदस्य अमन शेख, अरबाज पटेल, मयूर वाघमारे यांनी अल्पवयीन मुलांमार्फत गणेश काळेवर गोळीबार व कोयत्याने वार करून खून केला. आरोपींनी हा कट कोठे व कधी रचला, त्यांचे आणखी कोण साथीदार होते, याबाबत तपास करायचा आहे. आंदेकर टोळीने आणखी काही पिस्तुले, काडतुसे, हत्यारे आणली आहेत का, याबाबत आरोपींची चौकशी करून घराची झडती घ्यायची आहे. त्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक आयुक्त नम्रता देसाई आणि विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
Web Summary : Pistol used in Ganesh Kale's murder was sourced from MP-Dhule border. The murder was revenge for Vanraj Andekar's death. Accused purchased weapons for ₹45,000. Four arrested under MCOCA; illegal gun factory busted.
Web Summary : गणेश काले की हत्या में इस्तेमाल पिस्तौल मध्य प्रदेश-धुले सीमा से खरीदी गई थी। हत्या वनराज आंदेकर की मौत का बदला थी। आरोपियों ने ₹45,000 में हथियार खरीदे। चार मकोका के तहत गिरफ्तार; अवैध बंदूक फैक्ट्री का भंडाफोड़।