Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरण; हुंडाबळी हा समाजावरचा मोठा कलंक, सासू, नणंद, पतीच्या मित्राचा जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 17:19 IST2025-09-29T17:16:48+5:302025-09-29T17:19:20+5:30
Vaishnavi Hagawane Case Update: कॉल डिटेल्स रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारातून कुटुंबियांचे आणि पतीच्या मित्राचे निकटचे नाते लक्षात येते

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरण; हुंडाबळी हा समाजावरचा मोठा कलंक, सासू, नणंद, पतीच्या मित्राचा जामीन अर्ज फेटाळला
पुणे : आरोपींवर कटकारस्थान रचणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, पुरावे नष्ट करणे आणि आरोपींना लपविण्याचे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे आरोपींना जामिनावर सोडल्यास साक्षीदारांवर दबाव येण्याची किंवा पुराव्यात छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हुंडाबळी हा समाजाला मोठा कलंक आहे, अशी निरीक्षणे नोंदवित हुंड्यासाठी मानसिक-शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिची सासू, नणंद आणि पतीच्या मित्राचा जामीन अर्ज पुणेन्यायालयाने फेटाळला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी हा आदेश दिला. वैष्णवीची सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५४), नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे (वय २१, दोघी रा. भुकूम, मुळशी) आणि निलेश रामचंद्र चव्हाण (वय ३५, रा. कर्वेनगर) अशी जामीन फेटाळलेल्या आरोपींची नावे आहेत. हुंडा व जमीन खरेदी करण्यासाठी सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय २४, रा. मुक्ताई गार्डनजवळ, मुळशी) यांनी १६ मेला राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी तिचा पती शशांक राजेंद्र हगवणे (वय २७), सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ६३), सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५४), सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि वैष्णवीच्या बाळाला बेकायदा ताब्यात ठेवून तिच्या नातेवाईकांना पिस्तुल दाखवून धमकावणारा निलेश चव्हाण यांच्यासह अन्य पाच आरोपींविरोधात बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या लता, करिश्मा आणि निलेशने जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला. त्याला विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार आणि तक्रारदारांचे वकील अॅड. शिवम निंबाळकर यांनी विरोध केला.
शवविच्छेदन अहवालात वैष्णवी यांच्या अंगावर ३० जखमा आढळून आल्या असून, दि. ११ ते १६ मे दरम्यान तिचा सातत्याने क्रूर छळ केला जात होता. तिने सासरी आत्महत्या केली आहे. व्हॉट्सअप चॅटिंग, साक्षीदारांची साक्ष यावरून वैष्णवी यांचा सातत्याने छळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आरोपी निलेश हुंड्याच्या प्रत्येक चर्चेवेळी उपस्थित होता. त्याने शशांक व करिश्माच्या मोबाईलमधील सीमकार्ड नष्ट केले आहेत. कॉल डिटेल्स रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारातून करिश्मा आणि निलेशमधील निकटचे नाते लक्षात येते, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील व तक्रारदारांच्या वकिलांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.