पुतळा विटंबना करणाऱ्याची उत्तरप्रदेशमधील कुंडली काढणार; पुण्यातून काँग्रेसचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 16:38 IST2025-07-07T16:36:58+5:302025-07-07T16:38:06+5:30
अशी कृत्ये करून महात्मा गांधींजींचे विचार संपणार नाहीत, याचा धडा खुद्द महात्मा गांधी यांची हत्या केल्यानंतर अजूनही काही जणांना मिळाला नाही

पुतळा विटंबना करणाऱ्याची उत्तरप्रदेशमधील कुंडली काढणार; पुण्यातून काँग्रेसचा इशारा
पुणे: रेल्वे स्थानकाच्या आवारात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा युवक उत्तरप्रदेशमधील वाराणसी येथून पुण्यात आलेला आहे. तिथे तो कोणत्या पक्षाशी संबंधित आहे का? तो तिथे कोणाचा कार्यकर्ता आहे का? याची माहिती वाराणसीमधून जमा करण्याचे काँग्रेसने सोमवारी सकाळी पुतळ्याजवळ केलेल्या आंदोलनात जाहीर केले. अशी कृत्ये करून महात्मा गांधींजींचे विचार संपणार नाहीत, याचा धडा खुद्द महात्मा गांधी यांची हत्या केल्यानंतर अजूनही काही जणांना मिळाला नसल्याची टीका यावेळी करण्यात आली.
आंदोलनानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पक्षाच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात आला. शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे तसेच रफिक शेख, अविनाश बागवे, अजित दरेकर, मेहबुब नदाफ, राज अंबिके, प्राची दुधाने, सीमा सावंत, अनुसया गायकवाड, सुंदर ओव्हाळ, उषा राजगुरू, माया डुरे, ॲड. राजश्री अडसुळ, मंदा जाधव, प्रदीप परदेशी, राजेंद्र भुतडा व अन्य पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. शहराध्यक्ष शिंदे यांनी यावेळी पोलिसांनी संबंधित आरोपीला मनोरुग्ण वगैरे ठरवू नये, या संपूर्ण प्रकरणाचा व्यवस्थित तपास करावा, अशी मागणी केली.
शिंदे म्हणाले, ‘सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या अशा गोष्टी वारंवार होत आहेत. राज्यकर्त्यांच्या दबावामुळे पोलिस या घटनांची गंभीर दखल घेत नाही, त्यामुळेच अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांचे धाडस वाढत आहे.’ ॲड. छाजेड यांनी सांगितले की, पोलिस याचा तपास करतीलच, पण काँग्रेसच्या वतीनेही वाराणसीमधील काँग्रेस शाखांमध्ये या आरोपीचे छायाचित्र व माहिती पाठवली जाईल. भगवे कपडे घालून असे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या व्यक्तीची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, तसेच त्याला कठोर शिक्षा होणेही आवश्यक आहे. झोन-२ चे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.