Pune Rain: ४ दिवसांपासून ‘अवकाळी’चा कहर! धनकवडी, बालाजीनगर, खडकवासला, आंबेगाव पठार, सातारा रस्ता जलमय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 17:42 IST2026-04-02T17:37:37+5:302026-04-02T17:42:03+5:30
पुण्यात सर्वत्र मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट, उपनगरात सगळीकडे पाण्याचे साम्राज्य

Pune Rain: ४ दिवसांपासून ‘अवकाळी’चा कहर! धनकवडी, बालाजीनगर, खडकवासला, आंबेगाव पठार, सातारा रस्ता जलमय
धनकवडी : पुणे शहराला सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपून काढले असून गुरुवारी (दि. २) दुपारी धनकवडीसह दक्षिण उपनगरात निसर्गाच्या रौद्ररूपाचा अनुभव नागरिकांना घ्यावा लागला. अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे काही मिनिटांतच सातारा रस्त्याचा चेहरामोहरा बदलला आणि अनेक ठिकाणी रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले.
उन्हाळ्याच्या कडाक्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने काहीसा दिलासा दिला असला, तरी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. तासाभराहून अधिक काळ सुरू असलेल्या पावसाने धनकवडी, बालाजीनगर, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार आणि सातारा रस्त्याच्या सखल भागांना चांगलाच फटका बसला. खडकवासला, धनकवडी, आंबेगाव, कात्रज मध्ये तासाभरात तब्बल ९८.८ मी. मी. पावसाची नोंद झाली.
भरदिवसा अंधाराचे साम्राज्य
पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, दुपारीच आकाश काळ्याकुट्ट ढगांनी व्यापले आणि भरदिवसा रात्रीसारखा अंधार पसरला. दृश्यमानता कमी झाल्याने वाहन चालकां ना हेडलाईट्स लावून प्रवास करावा लागला, परिणामी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.
रस्त्यांवर पाण्याचे साम्राज्य, वाहनचालकांची कसरत
पद्मावती परिसरात दीड फूट पाणी साचल्याने दुचाकी वाहून जाण्याच्या घटना घडल्या. अनेक दुचाकी बंद पडल्याने चालकांना पावसातच गाड्या ढकलत नेण्याची नामुष्की ओढवली. छत्री किंवा रेनकोट नसलेल्या पादचारी आणि दुचाकीस्वारांची मोठी तारांबळ उडाली.
वीज खंडित, झाडे उन्मळली
वादळी वाऱ्यामुळे के. के. मार्केटसह अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. दरम्यान, महावितरणच्या वीजपुरवठ्यावरही परिणाम होऊन अनेक भागांत वीज खंडित झाली. बुधवारी सायंकाळी झालेल्या गारपिटीच्या जखमा ताज्याच असताना गुरुवारी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.