निमोणे : चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणाच्या बॅकवॉटरमध्ये अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळला असून मच्छी व्यापारी बाळासाहेब कचरे यांनी यासंदर्भात शिरूर पोलिस स्टेशनला खबर दिली आहे.
यासंदर्भात हकीकत अशी की, बाळासाहेब जगन कचरे हे चिंचणी (ता. शिरूर) गावच्या हद्दीत घोड धरणाच्या कडेस वास्तव्यास आहेत. तेथेच त्यांची पाण्याची मोटार आहे. त्यामुळे त्या भागात त्यांचे येणे-जाणे चालू असते. १३ रोजी ७:३०च्या सुमारास त्यांना गावातीलच अनिल माणिक पवार यांनी फोनद्वारे पाण्यात मृतदेह असल्याची माहिती दिली. त्यानंतर कचरे यांनी समक्ष जाऊन खात्री केली. काही वेळानंतर पोलिस आले तेव्हा पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला असता सदर मृतदेह पुरुष जातीचा अनोळखी वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असून अंगावरील त्वचा पाण्यात गळून पडलेली दिसत आहे. जलचर प्राण्याने ठिकठिकाणी कुरतडलेले दिसून आले. मृतदेहाची दुर्गंधी सुटलेली होती. पोलिसांनी तो ताब्यात घेऊन पुढील तजवीज केली. यासंदर्भात शिरूर पोलिस स्टेशनचे टेंगले अधिक तपास करीत आहेत.