देवदर्शनावरून परतताना दुर्दैवी घटना; शिक्रापूर-चाकण रोडवर ट्रकची जोरदार धडक, कारचा चक्काचूर, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 19:09 IST2025-12-22T19:07:36+5:302025-12-22T19:09:32+5:30
भंगार भरलेल्या ट्रकने वेगात ओव्हरटेक करताना कारला जोरदार धडक दिली, ज्यामुळे मोठा अपघात झाला

देवदर्शनावरून परतताना दुर्दैवी घटना; शिक्रापूर-चाकण रोडवर ट्रकची जोरदार धडक, कारचा चक्काचूर, एकाचा मृत्यू
शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण मार्गावर रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात देवदर्शनहून परतत असलेल्या चार युवकांच्या कारला ट्रकने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातामुळे कार चक्काचूर झाली. कार चालक सागर दत्तात्रय थोरात (वय २८, रा.चाकण; मूळ रा.कनोली, ता.संगमनेर, जि.अहमदनगर) यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर विनोद हावतराव खंडागळे, भागवत उत्तम पवार आणि संतोष बाळासाहेब सोनवणे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
अधिक माहितीनुसार, चाकणकडून येत असलेल्या एमएच १४ एफसी ६४८३ या भंगार भरलेल्या ट्रकने वेगात ओव्हरटेक करताना कारला जोरदार धडक दिली, ज्यामुळे मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील सर्व जण अडकल्याने शिक्रापूर पोलिस मित्र अतुल थोरवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना वाहनातून बाहेर काढले व जवळील रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी नातेवाईक बाळासाहेब मारुती थोरात यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये ट्रक चालक सुजीत तुकाराम मासाळ (वय २३, रा.हरगुडेवस्ती, चिखली, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार उद्धव भालेराव करीत आहेत.