दुर्दैवी घटना! ट्रकने उडविले, बसची वाट पाहत थांबलेल्या आजीसह कडेवरील नातीने गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 11:00 IST2024-04-30T10:59:27+5:302024-04-30T11:00:12+5:30
खासगी बसची वाट पाहत थांबलेल्या असताना भरधाव ट्रकचालकाने आजी आणि नातीला धडक दिली

दुर्दैवी घटना! ट्रकने उडविले, बसची वाट पाहत थांबलेल्या आजीसह कडेवरील नातीने गमावला जीव
पुणे: कोल्हापूरला जाण्यासाठी खासगी बसची वाट पाहणाऱ्या आजी आणि नातीला आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २७) मध्यरात्री भूमकर ब्रीज-नऱ्हे भागात घडली. याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.
शीतल सिद्धराम पाटील (वय ४२) आणि अबोली सूरज शेटके (६) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आजी आणि नातीचे नाव आहे. याबाबत रोहन पाटील (१९, रा. नऱ्हे) याने सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पांडुरंग सुनील पिनाटे (२८, रा. तुगाव, ता. भालकी, जि. बेळगाव, कर्नाटक) या ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील कुटुंबीय शनिवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास कोल्हापूरला निघाले होते. बाह्यवळण मार्गावर पाटील कुटुंबीय खासगी प्रवासी बसची वाट पाहत थांबले होते. शीतल पाटील यांनी नात अबोलीला कडेवर घेतले होते. त्यावेळी भरधाव ट्रकचालकाने शीतल आणि अबोलीला धडक दिली. अपघातात दोघी गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच दोघींचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अस्मिता लाड तपास करीत आहेत.