कसबा पेठेत दुर्दैवी मृत्यू : कुत्रा मागे लागल्याने इलेक्ट्रिशियन तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 11:25 IST2025-11-20T11:22:30+5:302025-11-20T11:25:19+5:30
Pune News: पुण्याच्या कसबा पेठेत एका धक्कादायक घटनेत इलेक्ट्रिशियन रमेश गायकवाड (वय ४५) यांचा कुत्र्याच्या भीतीने तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

कसबा पेठेत दुर्दैवी मृत्यू : कुत्रा मागे लागल्याने इलेक्ट्रिशियन तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला
पुण्याच्या कसबा पेठेत एका धक्कादायक घटनेत इलेक्ट्रिशियन रमेश गायकवाड (वय ४५) यांचा कुत्र्याच्या भीतीने तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कुत्र्याचा मालक सिद्धार्थ दिलीप कांबळे (वय २४, रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, कसबा पेठ) याच्याविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी जया रमेश गायकवाड (वय ४०) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
घटना कशी घडली?
मंगळवार पेठेत राहणारे रमेश गायकवाड हे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात. १ ऑक्टोबर रोजी ते आपल्या सहकाऱ्यासह कसबा पेठेतील सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये दुरुस्तीच्या कामासाठी आले होते. ते इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असताना चौथ्या मजल्यावरून सिद्धार्थ कांबळे यांचा कुत्रा अचानक त्यांच्या मागे लागला. कुत्रा मागे लागल्याने घाबरून रमेश गायकवाड जिन्यावरून खाली पळू लागले. पळत असताना ते तोल जाऊन इमारतीतील डक्टमध्ये कोसळले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
कुत्र्याच्या मालकावर गुन्हा
घटनेनंतर रमेश यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून सिद्धार्थ कांबळे याच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुत्र्याला योग्य ताब्यात न ठेवणे व खबरदारी न घेणे यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक गोरे पुढील तपास करत आहेत.