शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, तो यापुढे काळजी घेईल; अजित पवारांकडून पार्थची पाठराखण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 20:53 IST2025-11-08T20:52:20+5:302025-11-08T20:53:17+5:30
कितीही विश्वासू लोक असले तरी तज्ज्ञांशी चर्चा करून असे व्यवहार करायचे, भले चार पैसे गेले तरी चालतील. शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, पार्थ यापुढे काळजी घेईल

शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, तो यापुढे काळजी घेईल; अजित पवारांकडून पार्थची पाठराखण
पुणे : कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यापूर्वी तज्ञ वकिलांमार्फत त्याचा अभ्यास केला जातो. त्या संदर्भात नोटीस दिली जाते. मात्र मुंढव्यातील जमीन प्रकरणांमध्ये असे काहीही झाले नाही. या व्यवहाराची मला माहिती नव्हती, नाही तर मी हे होऊ दिले नसते, असे मत उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. हे प्रकरण या प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय चौकशी समिती करत असून भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश राज्य सरकारने समितीला दिले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शनिवारी पुण्यातील पक्ष कार्यालयात जिल्ह्यातील नेते व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी मुंढवा जमिन प्रकरण, निवडणुका यांसह विविध विषयावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, मुंडव्यातील प्रकरण असो किंवा बोपडीतील असो, जमीन शासनाची आहे. त्यामुळे हे व्यवहार नोंदणी अधिकाऱ्यांनी थांबवणे गरजेचे होते. मात्र, असे झाले नाही. मुंढव्याच्या जमीन प्रकरणांमध्ये एका रुपयाचाही व्यवहार झालेला नाही, तरीही खरेदीखत झाले. हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे. यामध्ये जे तीन लोक प्रथमदर्शनी दोषी आढळले आहेत त्यांच्यावर कारवाई केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. या समितीने काय तपास करायचा, या संदर्भात राज्य सरकारने मार्गदर्शक नोट तयार केली आहे. भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही समितीला दिल्या आहेत. चौकशी झाल्यावर सर्व समोर येईल, असेहीते म्हणाले.
मुंढव्यातील जमीन प्रकरणाबाबत पार्थने मला कल्पना दिली नाही. हे प्रकरण उजेडात आल्यापासून मी अद्याप पार्थला भेटलो नाही. उद्या त्याच्याशी बोलेन, कितीही विश्वासू लोक असले तरी तज्ज्ञांशी चर्चा करून असे व्यवहार करायचे, भले चार पैसे गेले तरी चालतील. शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, तो यापुढे काळजी घेईल, असेही पवार म्हणाले. पार्थ पवार यांच्या संदर्भात सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी केलेल्या भाष्याबाबत आपणास काहीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माझ्या नातेवाईकांना सवलत नको
"मी नियमाने काम करणारा कार्यकर्ता आहे. आत्तापर्यंत माझ्यावर अनेक आरोप झाले. पण ते सिद्ध झाले नाही. मात्र माझी बदनामी झाली. त्यामुळे मी आता प्रशासनाला सांगितले आहे की, माझ्या कुणी कितीही जवळचा किंवा नातेवाईक असो कुणाचे ही काम नियमाच्या बाहेर जाऊन करू नका," असेही अजित पवार म्हणाले.
स्थानिक पातळीवर आघाडी व युती संदर्भात निर्णय होईल
पूर्वी आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो, त्यावेळीही मोठ्या निवडणुका आम्ही एकत्रित लढत. मात्र, स्थानिक पातळीवरील निवडणुका या स्वतंत्र लढत. आत्ता आम्ही महायुतीमध्ये आहेत. महायुतीतील जो पक्ष पॉवरफुल आहे, तो पक्ष, त्यांचे नेते, सहकारी पक्षाशी कसे वागतात, यावर सर्व अवलंबून आहे. मात्र, नऊ वर्षानंतर स्थानिक पातळीवरील निवडणुका होत आहेत. त्यामुळे या निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे. प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यात वेगळी परिस्थिती असते, राजकीय गणित वेगळी असतात। त्यामुळे या निवडणुकांमध्ये युती करायची, की आघाडी, यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले जाणार आहेत.
देशातील मोठ्या नेत्यांमध्ये साहेबांचे नाव वरच्या स्थानी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप सोडून इतर पक्षांशी आघाडी करण्याचे संकेत शरद पवार यांनी नुकतेच दिले. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, साहेब हे देशातील वरिष्ठ पाच-सहा नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचे नाव या सर्वांमध्ये सर्वात वर आहे. त्यामुळे ते काय बोललेत, यावर हे मी बोलू शकत नाही. शेवटी त्यांचं मार्गदर्शन राज्यातील आणि देशातील सर्वच नेते घेतात. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी होईल का? या प्रश्नावर मात्र अजित पवार यांनी थेट होकार किंवा नकार देणे टाळले.