उजनी धरण पाणी पातळी ३८ टक्क्यांवर; गतवर्षीच्या तुलनेत २० टक्के पाणी साठा जास्त, शेतकरी समाधानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 16:40 IST2026-04-08T16:39:02+5:302026-04-08T16:40:19+5:30
गतवर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी यंदा पाणी साठा जास्त असल्याने शेतकरी, वर्गासह उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण पहायला मिळत आहे

उजनी धरण पाणी पातळी ३८ टक्क्यांवर; गतवर्षीच्या तुलनेत २० टक्के पाणी साठा जास्त, शेतकरी समाधानी
भिगवण : पुणे, सोलापूर,अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या उजनी धरण (यशवंत सागर जलाशय) यंदाची पाणी पातळी समाधानकारक असून बुधवारी (दि,८) रोजी पाणी पातळी ३८ टक्के झाली असून गतवर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी यंदा पाणी साठा जास्त असल्याने शेतकरी, वर्गासह उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण पहायला मिळत आहे.
यंदा सर्वत्र मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि धरण पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस झाल्याने उजनी धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरलेले होते. याचा फायदा धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी, मासेमार, औद्योगिक कारखाने, शहरांच्या पाणी पुरवठा योजनांना होत आहे. बाष्पीभवनामुळे पाण्याच्या पाणी पातळीत लक्षणीय घट होत आहे. रब्बी हंगामात १५ ऑक्टोबर ते २८ फेब्रुवारी दरम्यान ४.६७ टीएमसी पाणी बाष्पीभवन झाले. तसेच १ मार्च ते ६ एप्रिल या उन्हाळी कालावधीत १.६० टीएमसी पाणी कमी झाले आहे.
उजनी जलाशयाच्या पाण्यावर दौड, इंदापूर, कर्जत, करमाळा तालुक्यातील पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. नदीकाठच्या गावांमधील शेती पूर्णतः उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाणी पातळी खाली गेल्यावर विद्युत पंप पाण्यासोबत खाली नेण्याची धडपड शेतकऱ्यांना करावी लागते. यामुळे पाण्याचे नियोजन व्यवस्थित न झाल्यास यापुढील काळात धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी, मासेमार यांचे नियोजन कोलमडले जाते. पुढील शिल्लक पाण्याचे योग्य नियोजन कालवा सल्लागार समितीला करावे लागणार आहे.
उजनी धरण पाणी पातळी आकडेवारी
एकूण पाणी पातळी - ४९३.६२० मी.
पाणी पातळी क्षेत्र - २५१.४७ चौ.कि.मी.
एकूण साठा - २३८०.३५ द.ल.घ.मी.
-------- ( ८४.०५ टीएमसी)
उपयुक्त साठा - ५७७.५४ द.ल.घ.मी.
-------- ( २०.३९ टीएमसी)
उपयुक्त साठ्याची टक्केवारी -------- ३८.०७%