इंदापूर: उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाण्यावर प्रदूषणाचा ठपका कायम असताना, हेच पाणी पिण्यासाठी वापरताना इंदापूर नगरपरिषदेच्या जलपुरवठा विभागाला शुद्धीकरणाच्या पद्धतीत बदल करण्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिक सांडपाणी आणि रासायनिक प्रदूषण यामुळे सध्याची प्रक्रिया अपुरी ठरत असल्याचे चित्र आहे.
उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील माळवाडी क्रमांक २ येथे नगरपरिषदेची महत्त्वाची पाणीपुरवठा योजना कार्यरत आहे. येथे दररोज तीन दशलक्ष लिटर आणि सहा दशलक्ष लिटर क्षमतेचे असे दोन जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत. जुन्या योजनेद्वारे शहराच्या मूळ भागाला पाणीपुरवठा केला जातो, तर नवीन सहा दशलक्ष लिटर क्षमतेच्या प्रकल्पात आधुनिक फिल्टरेशन बेड व स्वयंचलित यंत्रणेचा वापर केला जातो. या दोन्ही योजनांमुळे एकूण नऊ दशलक्ष लिटर पाणी शुद्ध करण्याची क्षमता नगरपरिषदेकडे उपलब्ध आहे.
सध्या पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीन, बेंटोनाइट, पॉलिॲल्युमिनियम क्लोराईड, क्लोरीन डायऑक्साइड यांसारख्या रसायनांचा वापर केला जातो. या पद्धतीमुळे गाळ कमी होणे, जीवाणू नष्ट होणे आणि पाण्याचा गढूळपणा कमी होणे शक्य होते. मात्र, या रासायनिक प्रक्रियांना मर्यादा आहेत. क्लोरीनचा उग्र वास, ॲल्युमिनियमचे संभाव्य दुष्परिणाम, तसेच सूक्ष्मजंतू व रासायनिक प्रदूषण पूर्णपणे दूर न होण्याची शक्यता यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
विशेषतः उजनी धरणातील पाण्याचा टीडीएस प्रमाण साधारण ४५० ते ७०० पीपीएमदरम्यान आढळत असून, उन्हाळ्यात ते ८०० पीपीएमच्या पुढे जाण्याची शक्यता असते. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील अपुरे प्रक्रिया केलेले सांडपाणी, औद्योगिक रसायने, तसेच शेतीतील खतांमुळे निर्माण झालेले नायट्रेट्स यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावत आहे. शिसे, पारा, आर्सेनिकसारखे जड धातू साध्या प्रक्रियेतून पूर्णतः दूर होत नाहीत, ही चिंताजनक बाब आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार ५०० पीपीएमपर्यंतचा टीडीएस पिण्यास योग्य मानला जातो. मात्र उजनीचे पाणी थेट पिण्यास अयोग्य असून त्यावर प्रगत प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
यामुळे ओझोनेशन व ॲक्टिव्हेटेड कार्बन यांसारख्या बहुस्तरीय जलशुद्धीकरण तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. मात्र, नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो की नाही, याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
शहराच्या वाढत्या गरजा आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जलशुद्धीकरण प्रक्रियेत सुधारणा करणे ही काळाची गरज ठरत असून, याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
Web Summary : Ujani Dam water quality is deteriorating due to pollution, posing purification challenges for Indapur. Current methods using chlorine and other chemicals may be insufficient, raising health concerns. Advanced filtration is needed.
Web Summary : उजनी बांध के पानी की गुणवत्ता प्रदूषण के कारण गिर रही है, जिससे इंदापूर के लिए शुद्धिकरण की चुनौती बढ़ गई है। क्लोरीन जैसे रसायनों के इस्तेमाल से स्वास्थ्य संबंधी चिंताएँ बढ़ रही हैं। आधुनिक निस्पंदन ज़रूरी है।