By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 21:45 IST
1 / 6निळाशार समुद्र, किनाऱ्यावरील वाळू आणि फेसाळणाऱ्या लाटा हे दृश्य मनाला नेहमीच भुरळ घालते. पण, कल्पना करा की तुम्ही चक्क अथांग समुद्राच्या मधोमध जमिनीवरून चालत जात आहात आणि तुमच्या दोन्ही बाजूंना समुद्राच्या उंच लाटा उसळत आहेत. हा काही एखाद्या पौराणिक कथेतील किंवा 'मोझेस'च्या चमत्काराचा भाग नाही, तर दक्षिण कोरियामधील एक अद्भुत वास्तव आहे.2 / 6दक्षिण कोरियामधील 'जिनडो' आणि 'मोडो' या दोन बेटांच्या दरम्यान हा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतो. वर्षातून दोनवेळा इथला समुद्र चक्क दोन भागांत विभागला जातो आणि साधारण २.८ किलोमीटर लांबीचा एक कोरडा रस्ता तयार होतो. या रस्त्याची रुंदी सुमारे ४० मीटर असते. यालाच 'मिरॅकल सी रोड' किंवा 'रहस्यमयी समुद्री मार्ग' असे म्हटले जाते.3 / 6अनेकांना हा चमत्कार वाटत असला, तरी यामागे वैज्ञानिक कारण आहे. हा रस्ता 'ज्वार-भाटा' (High and Low Tide) मुळे तयार होतो. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी जेव्हा खाली जाते, तेव्हा समुद्राच्या तळाशी असलेली जमीन वर येते. यामुळे पाणी मागे सरकते आणि दोन बेटांना जोडणारा एक नैसर्गिक पूल तयार होतो.4 / 6हा रस्ता कायमस्वरूपी नसतो. तो केवळ काही तासांसाठीच (साधारण १ तास) खुला होतो. समुद्राचे पाणी पुन्हा वाढू लागण्यापूर्वी पर्यटकांना हा रस्ता पार करावा लागतो किंवा परत फिरावे लागते. या अद्भुत घटनेचा आनंद घेण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक येथे येतात.5 / 6जेव्हा हा समुद्र दुभंगतो, तेव्हा तिथे 'जिनडो सी पार्टिंग फेस्टिव्हल' साजरा केला जातो. या काळात लोक या कोरड्या रस्त्यावर चालतात, समुद्रात उघड्या पडलेल्या शिंपल्या गोळा करतात आणि स्थानिक लोकगीतांचा आनंद घेतात. या घटनेला कोरियाचा मोझेस चमत्कार असेही संबोधले जाते. एप्रिल महिन्याच्या अखेरीस अनेकदा हे दृश्य पाहायला मिळते.6 / 6जर तुम्हाला साहसी पर्यटनाची आवड असेल, तर निसर्गाचा हा अविश्वसनीय खेळ पाहण्यासाठी दक्षिण कोरियातील या जागेला नक्की भेट द्यायला हवी.