Pune: उबेर चालकाच्या खून; मृतदेह घाटात फेकून दिला, आरोपीला अखेर पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 13:14 IST2026-03-09T13:13:34+5:302026-03-09T13:14:06+5:30
गणेशखिंड घाटात गाडी थांबवल्यानंतर आरोपी व चालक यांच्यात वाद होऊन झटापट झाली, यावेळी आरोपीने चालकाच्या हातातील चाकू हिसकावून त्याच्या मानेवर वार करून त्याचा खून केला

Pune: उबेर चालकाच्या खून; मृतदेह घाटात फेकून दिला, आरोपीला अखेर पोलिसांकडून अटक
ओतूर: उबेर चालकाचा खून करून मृतदेह घाटात फेकून दिल्याच्या प्रकरणात ओतूर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत आरोपीला अटक केली आहे. आदर्श चंद्रकांत भालेराव (वय २१, रा. संकेश्वर किस्टल सोसायटी, गणेश विद्यालयाजवळ, टिटवाळा ईस्ट, ता. कल्याण, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नासीर अहमद सलामतुल्ला अन्सारी (वय २६, मूळ रा. शेरकोट, ता. धामपूर, जि. बिजनोर, उत्तर प्रदेश; सध्या रा. समता नगर, सेक्टर १, ऐरोली नाका, नवी मुंबई) हा उबेर चालक ५ मार्च रोजी टिटवाळा येथून जुन्नरकडे प्रवासी घेऊन निघाला होता. माळशेज घाटमार्गे सितेवाडी (ता. जुन्नर) येथील गणेशखिंड घाटात गाडी थांबवल्यानंतर आरोपी व चालक यांच्यात वाद होऊन झटापट झाली. यावेळी आरोपीने चालकाच्या हातातील चाकू हिसकावून त्याच्या मानेवर वार करून त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेह घाटातील सिमेंटच्या कठड्यावरून खाली फेकून आरोपी गाडी घेऊन टिटवाळ्याकडे पळून गेला. मृताच्या भावाने मोहम्मद अमिर सलामतुल्ला अन्सारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ८ मार्च रोजी भा. न्याय संहिता २०२३ कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. उबेर कंपनीकडील माहिती व जीपीएस तपासातून आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.
पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ओतूर एल.जी. थाटे, पीएसआय संदिप आमणे, पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे,नामदेव बांबळे,बाळशिराम भवारी, देविदाव खेडकर,भरत सुर्यवंशी, रोहित बोंबले यांनी ही कारवाई केली. आरोपीला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.