स्वारगेटला सापडले दोन भुयारी मार्ग : जमिनीखाली विटांचे पक्के बांधकाम 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 11:47 AM2019-03-29T11:47:19+5:302019-03-29T11:53:06+5:30

पायलिंग मशीनद्वारे खोदकाम सुरु असतानाच अचानक जमीन खचली आणि खाली मोठा खड्डा पडला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीमध्ये याठिकाणी दोन भुयारं आढळून आली आहेत.

Two subways found in Swargate: veet construction of brick under ground | स्वारगेटला सापडले दोन भुयारी मार्ग : जमिनीखाली विटांचे पक्के बांधकाम 

स्वारगेटला सापडले दोन भुयारी मार्ग : जमिनीखाली विटांचे पक्के बांधकाम 

googlenewsNext
ठळक मुद्देस्वारगेटच्या मल्टीमोडल हबच्या कामादरम्यान खचली जमीनमेट्रोकडून पुरातत्व विभागाला पाहणी आणि तपासणी करण्याची विनंती केली जाणार

- लक्ष्मण मोरे/युगंधर ताजणे 
पुणे : शहरामध्ये ठिकठिकाणी मेट्रोचे काम सुरु आहे. एकीकडे मेट्रोचे खांब उभे करण्याचे काम सुरु आहे. तर दुसरीकडे स्वारगेटला मल्टी मोडल हबची उभारणी करण्याच्या कामानेही वेग पकडला आहे. बुधवारी याठिकाणी पायलिंग मशीनद्वारे खोदकाम सुरु असतानाच अचानक जमीन खचली आणि खाली मोठा खड्डा पडला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीमध्ये याठिकाणी दोन भुयारं आढळून आली आहेत. जमिनीच्या बारा ते पंधरा फुटांखाली असलेल्या या भुयारांचे बांधकाम पक्क्या स्वरुपाचे असून हे भुयार नेमके कधी बांधले गेले याबाबत खात्रीलायक माहिती मात्र मिळू शकलेली नाही. यासोबतच दोन दिवसांपासून हा विषयाची माहिती बाहेर कशी आली नाही याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्वारगेटला ज्याठिकाणी पालिकेचा जलतरण होता त्याठिकाणी मल्टी मोडल हब उभारण्यात येत आहे. राजर्षी शाहू महाराज बस स्थानकाच्या समोरील बाजूकडून मेट्रोच्या या हबचे काम सुरु आहे. बुधवारी पायलिंग मशिनच्या सहाय्याने जमिनीमध्ये खड्डे घेण्याचे काम सुरु करण्यात आले होते. हे काम सुरु असतानाच बसस्थानकाच्या बाजुच्या दिशेची जमीन खचली. त्याठिकाणी खड्डा पडला. त्यामुळे पायलिंग मशीनचे काम थांबविण्यात आले. कामगारांनी पाहिजे असता जवळपास आठ ते दहा फुटांचा खड्डा पडल्याचे दिसले. 


मेट्रोच्या अधिकाऱ्यांना जमिनीखाली नेमका कसला खड्डा आहे याची काहीच माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी समांतर बाजूला दुसरा खड्डा खोदला. तेथीलही जमीन खाली खचली. त्यामध्ये पडलेली माती आणि राडारोडा बाजूला काढण्यात आला. गुरुवारी सकाळी मेट्रोच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या खड्ड्यात उतरुन पाहणी केली. तेव्हा या खड्ड्यामधून पूर्व आणि पश्चिम बाजूसह उत्तरेच्या दिशेला भुयार जात असल्याचे निदर्शनास आले. भुयारामध्ये तीनही दिशांना जाऊन पाहणी केली असता दगडी बांधकाम करण्यात आल्याचे दिसले. त्यामुळे ही भुयारं नेमकी कधी आणि कोणी बांधली याचा शोध सुरु करण्यात आला. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता त्यांच्याकडून काहीही माहिती मिळू शकली नसल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. 
====
नेमके काय आढळले...
जमिनीखाली पाहणी केल्यानंतर आढळून आलेल्या भुयाराला तीन दिशांना वळविण्यात आल्याचे निदर्शनास आले. या भुयाराची कालव्यापासूनची लांबी 35 ते 40 मीटर आहे. तर ज्याठिकाणी हे भुयार आढळून तेथील लांबी 55 मीटर आहे. या भुयाराची एक बाजू सारसबागेच्या (पर्वती) दिशेने वळविण्यात आलेली आहे. तर दुसरी बाजू पूर्व दिशेला गुलटेकडीच्याबाजूला वळविण्यात आलेली आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी  ‘टोटल स्टेशन’ मशीनच्या सहाय्याने सर्वेक्षण केले असून भुयाराचा अंदाजे नकाशाही तयार केला आहे. हे भुयार एवढे मोठे आहे की सहा फुट उंचीची व्यक्तीही आरामात त्यामधून चालत जाऊ शकेल. भुयाराच्या तळाशी पाण्याने वाहून आणलेला सुकलेला गाळ आढळून आला आहे.
====
काही वर्षांपुर्वी पुण्यामध्ये खोदकामादरम्यान उच्छ्वास आढळून आला होता. पेशव्यांनी कात्रजच्या तलावामधून पुण्यात पाणी आणलेल्या जलवाहिनीची अनेकांनी पाहणी केली होती. स्वारगेटला आढळून आलेले हे भुयार त्याचाच तर एक भाग आहे किंवा कसे याबाबत शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. कारण स्वारगेटला आढळून आलेल्या भुयाराचे बांधकाम दगडी आणि जुन्या धाटणीचे दिसून आलो. यामुळे मेट्रोकडून पुरातत्व विभागाला पाहणी आणि तपासणी करण्याची विनंती केली जाणार आहे. 
====
निर्माणाधिन मल्टी मोडल हबच्या जागेवर महापालिकेचा जलतरण तलाव होता. हा तलाव मागील दहा ते पंधरा वर्षांपासून बंद होता. मात्र, त्यापुर्वी तो चांगल्या अवस्थेत होता. या जलतरण तलावामध्ये कालव्यामधून पाणी आणण्यात आले होते. त्यासाठी कालव्याला एक गेट बसविण्यात आलेले असून बारा ते पंधरा फुटांच्या व्यासाचे पाईपही बसविण्यात आलेले होते. या पाईपमधून जलतरण तलावात आणलेले पाणी दुसऱ्या बाजूने पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयाकडून सारसबागेमागून गेलेल्या अंबिल ओढ्यामध्ये सोडण्यात आलेले होते. कदाचित हे पाणी आणण्याकरिता भुयार बांधण्यात आलेले असावे असा अंदाज मेट्रोचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. 

Web Title: Two subways found in Swargate: veet construction of brick under ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.