Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 02:27 PM2024-05-15T14:27:46+5:302024-05-15T14:42:53+5:30

हॉस्पिटलचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती वृद्ध वडिलांना उचलून घेऊन हॉस्पिटलमध्ये चकरा मारताना दिसत आहे.

kanpur hospital video viral son kept wandering 70 year old man in his lap | Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक

Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक

यूपीच्या कानपूरमधील हॅलट हॉस्पिटलचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती वृद्ध वडिलांना उचलून घेऊन हॉस्पिटलमध्ये चकरा मारताना दिसत आहे. एकाही वॉर्ड बॉयने त्याला मदत केली नाही, तसेच स्ट्रेचरही मिळू शकला नाही. मुलगा आपल्या 70 वर्षांच्या वडिलांना उचलून घेऊन मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी इकडे तिकडे फिरत होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यूपीतील आरोग्य यंत्रणेची पोलखोल झाली आहे. यावरून सपाने योगी सरकारवरही निशाणा साधला आहे.

हा धक्कादायक प्रकार ज्यावेळी घडला जेव्हा आरोग्य विभागाचे प्रमुख सचिव पार्थ सारथी सेन शर्मा स्वतः GSVM कॉलेजमध्ये उपस्थित होते. असं असूनही कोणी मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. प्रमुख सचिवही वडिलांना उचलून घेऊन जाणाऱ्या मुलाकडे पाहत राहिले. नंतर तरुणाला वडिलांसाठी स्ट्रेचर मिळाला आणि उपचारासाठी कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. 

शुक्लागंज येथील रहिवासी अरविंद यांनी सांगितलं की, त्यांचे 70 वर्षीय वडील श्याम सुंदर यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले, परंतु त्यांना आराम मिळाला नाही. दोन आठवड्यांपासून त्यांनी खाणे, पिणे आणि चालणे देखील बंद केले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना हॅलेट रुग्णालयात आणलं. डॉक्टरांनी त्यांच्या काही चाचण्या करायला सांगितल्या पण स्ट्रेचर न मिळाल्याने मुलाने वडिलांना उचलून घेतलं. 
 
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर समाजवादी पक्षाने सरकारवर निशाणा साधत राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गेल्या सात वर्षात जनता या सगळ्याला कंटाळली असून, आता भाजपाला हरवून परत पाठवणार असल्याचं म्हटलं आहे

याबाबत मेडिकल कॉलेजचे प्राचार्य संजय काला म्हणाले की, दुपारी सचिवांसोबत आम्ही हॉस्पिटलमध्ये राऊंड मारत होतो. त्याचवेळी एक व्यक्ती आपल्या वडिलांना उचलून घेऊन आला. मात्र हा ब्लॉक हॉस्पिटलच्या दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या पलीकडे आहे. येथे व्हीलचेअर किंवा स्ट्रेचरची सोय नाही. मात्र हा आमच्या हॉस्पिटलचाच एक भाग आहे असे दाखवले जात आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे.
 

Web Title: kanpur hospital video viral son kept wandering 70 year old man in his lap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.