परमीटरुममध्ये जाऊन हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 01:51 PM2021-07-18T13:51:05+5:302021-07-18T13:51:12+5:30

पुण्यातल्या सेव्हन लव चौकातील घटना; पत्रकार असल्याचे ओळख पत्र गळ्यात घालून केला हा प्रकार

Two persons, including a female journalist, were arrested for going to the paramit room and demanding an installment | परमीटरुममध्ये जाऊन हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक

परमीटरुममध्ये जाऊन हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक

Next
ठळक मुद्देक्राईम चेक टाईम्सचे पत्रकार असून ते दिल्लीत रजिस्टर असल्याचे सांगितले

पुणे: पत्रकार असल्याचे ओळख पत्र गळ्यात घालून आम्ही क्राईम प्रेस रिपोर्टर असल्याचे सांगून परमिटरुम चालकाकडे हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

हाजलिना प्रमोद जयस्वाल (वय ३५, रा. ताडीवाला रोड) आणि सतपाल सिंग अमरसिंग बग्गा (वय ५७, रा. वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका ३० वर्षाच्या परमिट रुम चालकाने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

चालकाची सेवन लव चौक येथे इंप्रेस सेव्हन लव्हज परमिट रुम आहे. त्यांच्याकडे हाजलिना जयस्वाल व सतपाल बग्गा हे शनिवारी आले होते. त्यांनी गळ्यात प्रेस सीसीटी क्राईम चेक टाईम्स नावाचे ओळखपत्र घातले होते. त्यांनी आम्ही क्राईम प्रेस रिपोर्टर असून तुम्ही अवैद्यरित्या दारुची विक्री करत आहात. लोकांना आपल्या परमिटरुममध्ये बसवून दारु पिण्याची परवानगी देत आहात. तुमच्यावर कारवाई करणार आहे. तुमच्या मालकांना आमची टीम बोलवत आहे, असे सांगितले. त्यानंतर ते एक हजार रुपये घेऊन तेथून निघून गेले.

काही वेळाने त्यांनी फोन करुन जर केस करायची नसेल तर जादा ५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. त्यानंतर फिर्यादी यांनी खडक पोलिसांना फोन करुन याची माहिती सांगितली. तेव्हा पोलिसांच्या सूचनेनुसार फिर्यादी यांनी त्यांना पैसे देण्याची तयारी दर्शविली. शनिवारी दुपारी दीड वाजता ते पैसे घेण्यासाठी आले असताना पोलिसांनी दोघांना पकडले. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी सांगितले की, हे दोघांकडील ओळखपत्र बनावट असल्याचे दिसत आहे. ते आपण प्रेस सीसीटी क्राईम चेक टाईम्सचे पत्रकार असून ते दिल्लीत रजिस्टर असल्याचे सांगतात. त्याची खात्री करण्यात येत आहे.

Web Title: Two persons, including a female journalist, were arrested for going to the paramit room and demanding an installment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.