- अंबादास गवंडी
पुणे : पुणेरेल्वे स्थानकातून दैनंदिन दोनशेपेक्षा जादा गाड्या धावतात. तर दीड लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे पुणे स्टेशनवर ताण पडत आहे. त्यामुळे फलाट विस्तारीकण (यार्ड रिमॉडेलिंग) याशिवाय नवीन दोन फलाटांचा आराखडा अंतिम करण्यात आला आहे. शिवाय २४ डब्यांच्या गाड्यांसाठी चार फलाटांची लांबी वाढविण्यात येणार आहे. यामुळे पुणे स्थानकावरील ताण कमी होणार असून, प्रवाशांना फायदा होणार आहे. या सर्व कामासाठी तीनशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
पुण्यात बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. दिवसेंदिवस त्याचे प्रमाण वाढत आहे. परंतु पुणे रेल्वे स्थानकांचा विकास मात्र झाला नाही. त्यामुळे पुणे स्थानकांवर ताण पडत आहे. परिणामी रेल्वे गाड्यांना स्थानकात वेळेवर जागा मिळत नसल्याने उशीर होत आहे. पुणे रेल्वे स्थानक येथे सहा फलाट आहेत; पण त्यांची लांबी कमी असल्यामुळे २४ डब्यांची गाडी येथून सोडता येत नाही. पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट विस्तारीकरणाच्या (यार्ड रिमॉडलिंग) कामाला २०१६- १७ मध्येच मंजुरी मिळाली; परंतु हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट विस्तारीकरणाचा प्रस्ताव अनेक वर्षे धूळखात पडून आहे. हे काम सुरू होणार, असे वाटत असतानाच काम पुढे ढकलले जात आहे. परंतु नवीन आराखड्यानुसार पुणे स्थानकांवरील मालधक्याच्या शेजारी दोन फलाट नव्याने तयार करण्यात येणार आहे. यामुळे पुणे स्थानकांवरील फलाटांची संख्या आठ होणार असून, प्रवासी आणि रेल्वे दोघांनाही फायदा होणार आहे.
दोन मुख्य मार्गिका होणार
पुणे रेल्वे स्थानकावर सध्या मुख्य मार्गिका नाही. त्यामुळे प्रवासी रेल्वे गाड्या स्थानकात असले की, मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांना स्थानकाबाहेर थांबविले जाते. फलाट रिकामा झाल्यानंतर या मालगाड्या सोडल्या जातात. आता रेल्वे स्थानकाचा विकास करताना दोन स्वतंत्र मुख्य मार्गिका टाकण्यात येणार आहे. त्यामुळे फलाटावर गाड्या उभ्या असल्या, तरी मालगाड्यांची वाहतूक सुरळीत सुरू राहणार आहे. यामुळे वाहतूक गाड्यांचा वेळ वाचणार आहे.
फलाटांची संख्या आठ होणार
पुणे रेल्वे स्थानक येथे सध्या एकूण सहा फलाट आहेत. नवीन आराखड्यानुसार दोन नवीन फलाट तयार करण्यात येणार आहे. हे दोन फलाट मालधक्काच्या बाजूने मुंबईच्या दिशेने तयार केले जाणार आहेत. या कामासाठी अडीचशे ते तीनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम सुरू होण्याअगोदर इतर आवश्यक कामे सुरू केली आहेत, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.