दोन मंत्र्यांकडून 'माळेगाव'च्या सभासदांना धमकी; चंद्रराव तावरे यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 12:44 IST2025-06-08T12:43:34+5:302025-06-08T12:44:59+5:30

हे दोन्ही मंत्री कारखाना निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी माघारी घ्यावेत, अन्यथा तुमच्या घरातील नातेवाइकांच्या नोकरीवर गदा येईल, त्यांची नोकरी  जाईल, अशा प्रकारच्या धमक्या हस्तकामार्फत देत आहेत

Two ministers threaten Malegaon members Chandrarao Taware makes serious allegations | दोन मंत्र्यांकडून 'माळेगाव'च्या सभासदांना धमकी; चंद्रराव तावरे यांचा गंभीर आरोप

दोन मंत्र्यांकडून 'माळेगाव'च्या सभासदांना धमकी; चंद्रराव तावरे यांचा गंभीर आरोप

माळेगाव : साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शनिवारी (दि. ७) प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रराव तावरे यांनी राज्यातील दोन मंत्र्यांवर अनेक गंभीर आरोप केले. हे दोन्ही मंत्री कारखाना निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी माघारी घ्यावेत, अन्यथा तुमच्या घरातील नातेवाइकांच्या नोकरीवर गदा येईल, त्यांची नोकरी  जाईल, अशा प्रकारच्या धमक्या हस्तकामार्फत देत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.

तावरे म्हणाले, घोंगडी बैठका आम्ही घेतोय, लवकरच पॅनल जाहीर करीत आहोत. परंतु, संबंधित संभाव्य उमेदवारांच्या घरी जात दोन मंत्र्यांचे हस्तक त्यांना दमदाटी करतात. तू उभा राहू नको, अर्ज काढून घे, नाहीतर तुझ्या घरातील सदस्यांची नोकरी जाईल, त्यांच्यावर चौकशा लावल्या जातील अशा एक ना अनेक धमक्या हे दोन बलाढ्य मंत्री बारामतीमधील सभासदांना  देत आहेत. तसेच दमदाटीसुद्धा करीत आहेत. परंतु, माळेगावचा स्वाभिमानी सभासद या धमक्यांना, या दमदाटीला अजिबात घाबरणार नाहीत, असे तावरे म्हणाले. अजित पवार यांनी माळेगाव कार्यक्षेत्रात दोन वेळा अंतर्गत सर्व्हे केला आहे.

यामध्ये सत्ताधारी संचालकांना पुन्हा सत्ता प्राप्त होणार नसल्याने अजित पवार यांनी रडीचा डाव खेळून चार महिने निवडणूक लांबविण्याचे पाप केले. पवार खोटे बोलण्यात पारंगत आहेत. त्यांनी मागील निवडणुकीत नदीकाठच्या सभासदांना प्रचार सभेमधून निरा नदीचे प्रदूषण थांबविण्याचा शब्द दिला होता. परंतु, पाचही वर्षे सत्ता भोगूनसुद्धा नदीचे प्रदूषित पाणी यांना थांबवता आलेले नसल्याचे त्रिवार सत्य आहे.

सभासदांवर आर्थिक बोजा प्रदूषणामुळे क्षारपड जमिनीमध्ये वाढ झालेली दिसत आहे. क्षारपड जमिनीमध्ये उसाचे उत्पन्न फार कमी मिळत असल्याने सभासदांना आर्थिक बोजा सहन करावा लागत असल्याचे तावरे म्हणाले. ३.५० लाख रुपये खर्च करून नवीन गोडाऊन बांधले, त्यावर प्लास्टिकचे पत्रे टाकले. परंतु, पावसामध्ये ते पत्रे फुटल्याने पन्नास हजार साखरपोती भिजली. यामुळे कारखान्याचे पर्यायाने सभासदांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. अजित पवार यांचे एक टिपरूसुद्धा माळेगावला नाही. तरीसुद्धा कारखाना कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेण्यासाठी का धडपड करत आहेत, हे न उलगडलेले कोडे असल्याचे तावरे म्हणाले.

Web Title: Two ministers threaten Malegaon members Chandrarao Taware makes serious allegations