पुणे- मुंबई महामार्गावर दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू; मॉर्निंग वॉकला निघालेल्या व्यक्तीच्या निदर्शनास आल्याने अपघात झाला उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 16:14 IST2021-07-14T16:13:31+5:302021-07-14T16:14:29+5:30
महामार्गावरील भुयारी पादचारी मार्गाच्या पायऱ्यांवर एक पांढऱ्या रंगाची दुचाकी पडलेली दिसली. त्याच्या शेजारी दोन व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पायऱ्यांवर पडलेले आढळून आले

पुणे- मुंबई महामार्गावर दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू; मॉर्निंग वॉकला निघालेल्या व्यक्तीच्या निदर्शनास आल्याने अपघात झाला उघड
वडगाव मावळ: वडगाव मावळ गावच्या हद्दीतील जुना पुणे - मुंबई महामार्गावरील न्यू इंग्लिश स्कुल समोर असलेल्या भुयारी पादचारी मार्गात दुचाकी गेल्याने झालेल्या अपघात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी महामार्गाच्या सर्विस रस्त्यावरून मॉर्निंग वॉकला निघालेल्या संतोष सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आल्याने हा अपघात उघड झाला आहे. पुरण मोहनसिंग गिरी व चिराग बहादूर गिरी (दोघे रा. तळेगाव दाभाडे) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
संतोष सूर्यवंशी हे बुधवारी सकाळी ६ वाजल्याच्या सुमारास वडगावच्या हद्दीतील जुना मुंबई - पुणे महामार्गाच्या सेवा रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. त्यांना महामार्गावरील न्यू इंग्लिश स्कुल समोरील भुयारी पादचारी मार्गाच्या पायऱ्यांवर एक पांढऱ्या रंगाची दुचाकी दिसली. त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यावर असता त्यापुढे दोन व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पायऱ्यांवर पडलेले आढळून आले असता त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहिले असता अपघातातील दोन्ही जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी अपघातातील व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली आहे. अपघातातील दोन्ही व्यक्तींचा झाले असल्याने अपघात कसा झाला याची माहिती समजू शकलेली नाही. या अपघातातील पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप देसाई हे करत आहेत.