गणेश विसर्जनावेळी दोघांचा बुडून मृत्यू; मुळशी तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 12:49 IST2025-09-08T12:49:41+5:302025-09-08T12:49:49+5:30
संततधार पावसाने नदीस पूर परिस्थिती होती, पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने मृतदेह मिळण्यास उशीर लागला

गणेश विसर्जनावेळी दोघांचा बुडून मृत्यू; मुळशी तालुक्यातील घटना
घोटावडे : गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा दोन वेगवेगळ्या घटनेत बुडून मृत्यू झाला. ही घटना मुळशी तालुक्यातील भरे पुलाजवळील मुळा नदीपात्रात घडली. अजिंक्य दिगंबर त्रिब्यके (वय १९ मूळगाव मेहकर जि. बुलढाणा) हा सोमवारी सायंकाळी नदी पात्रात बुडाला तर लक्ष्मण हनुमान चव्हाण (वय २४ वर्षे, मूळगाव नावंदे ता. उदगीर जि. लातूर) हा तरुण त्याच ठिकाणी मंगळवारी पाण्यात पडून मृत्युमुखी पडला.
मुळशी धरण पूर्ण क्षमतेने भरत आल्यामुळे पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यात संततधार पाऊस मुळा नदीस पूर परिस्थिती होती पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होते. पौड पोलिस, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती जवान व पीएमआरडीएचे जवान यांनी प्रतिकूल परिस्थितीत बोटीच्या सहाय्याने शोध मोहीम दोन दिवस सुरू ठेवली. बुधवारी दुपारनंतर अजिंक्य यांचा मृतदेह भरे पुलापासून एक किलोमीटर अनंतराव सापडला. बुधवारी दिवसभर नदीपात्र बोटीच्या सहाय्याने ढवळून काढले परंतु सायंकाळी तीन किलोमीटर अनंतराव लवळे गावाच्या हद्दीत लक्ष्मणचा मृतदेह मिळाला.
पौड पोलिस ठाण्याचे जेष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव, बीट अंमलदार पालके, ओंबासे, पोरे, अनिता रवळेकर, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे, हनुमंत नवले, शार्दुल बलकवडे तर पीएमआरडीएचे अग्निशामक जवान महेश पाटील, मोहिते, दराडे, देशमुख, कोरडे, पाटील, पालवे, रानवरे, पठारे यांनी अथक परिश्रम करून प्रतिकूल परिस्थितीतून मृतदेह शोधला.