MPSC Exam : 'प्रश्नपत्रिका अन् ॲन्सर-की देतो...' एमपीएससीच्या परीक्षेपूर्वी पेपर देण्याचे आमिष दाखवणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 13:45 IST2025-02-02T13:43:04+5:302025-02-02T13:45:54+5:30
४० लाखांच्या बदल्यात परीक्षेच्या आदल्या दिवशी ती प्रश्नपत्रिका आणि ॲन्सर-की देण्याचे आमिष दाखवून अफवा पसरवली होती.

MPSC Exam : 'प्रश्नपत्रिका अन् ॲन्सर-की देतो...' एमपीएससीच्या परीक्षेपूर्वी पेपर देण्याचे आमिष दाखवणाऱ्या दोघांना अटक
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका व ॲन्सर-की देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी ४० लाख रुपये मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक २ ने अटक केली. दीपक दयाराम गायधने (वय २६, रा. चाकण, जि. पुणे, मूळ रा. तामसवाडी, ता. तुमसर, जि. भंडारा) आणि सुमित कैलास जाधव (२३, रा. चाकण, जि. पुणे, मूळ गाव वेहेगावर, ता. नांदगाव, जि. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. त्यांचा एक साथीदार योगेश वाघमारे याला नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले. इतर दोघांना चाकण एमआयडीसी येथून ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत गायधने आणि जाधव यांना वाघमारे याने २४ उमेदवारांची यादी दिली होती. त्यातील नांदगाव येथील दोन विद्यार्थ्यांना त्यांनी फोन करून प्रश्नपत्रिका व ॲन्सर-की चे आमिष दाखवले होते. ते देण्यासाठी त्यांनी ४० लाख रुपये मागितले. ४० लाखांच्या बदल्यात परीक्षेच्या आदल्या दिवशी ती प्रश्नपत्रिका आणि ॲन्सर-की देण्याचे आमिष दाखवून अफवा पसरवली होती. विद्यार्थी, पालक व सामन्य लोकांमध्ये त्यांनी भीती पसरवली होती. मात्र, करण्यात आलेल्या चौकशीमध्ये त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या प्रश्नपत्रिका नसल्याचे व केवळ फसवणूक करण्याच्या हेतूने त्यांनी हा संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. २४ उमेदवारीची यादी आरोपींना कशी मिळाली. याचा पोलिस तपास करत आहे. मात्र, एमपीएसीचा पेपर फुटल्याबाबत काहीही निष्पन्न झाले नसल्याची माहिती पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली. ही कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक यशवंत ओंबासे, सैदोबा भोजराव, संग्राम शिनगारे, प्रशांत शिंदे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, चेतन आपटे, अजिनाथ येडे आणि मयूर भोकरे यांच्या पथकाने केली.