Navle bridge Accident: नवले पुलाजवळ ट्रकचा ब्रेक न लागल्याने तीन वाहनांना धडक, एकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 13:56 IST2025-05-03T13:55:44+5:302025-05-03T13:56:38+5:30
घटनेत तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर

Navle bridge Accident: नवले पुलाजवळ ट्रकचा ब्रेक न लागल्याने तीन वाहनांना धडक, एकाचा जागीच मृत्यू
पुणे: पुण्यातील नवले ब्रीज परिसरात शनिवारी दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. पहाटेच्या घटनेत भरधाव मर्सिडिजच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याच्या साडेनऊ तासांनंतर या घटनेपासून ३०० मीटर अंतरावर एका भरधाव ट्रकने तीन वाहनांना धडक दिली असून एका दुचाकीस्वाराला चिरडले. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. राहुल खाटपे (३४, रा. वडगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
हैदराबाद येथून तांदूळ घेऊन मुंबईकडे निघालेला ट्रक नवले ब्रीज परिसरात येताच, ट्रकचा ब्रेक न लागल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान सिंहगड रोड पोलिसांनी ट्रक चालक संजय बिराजदार (३६, रा. गुलबर्गा, कर्नाटक) याला ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे.