व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 18:06 IST2025-05-15T17:59:24+5:302025-05-15T18:06:59+5:30

पाकिस्तानात घुसून पाकीस्तान उध्वस्त करणारा आमचा भारत आहे, ते भारताला नखही लावू शकले नाहीत

Traders should not give in to anyone's threats; we are with you - Devendra Fadnavis | व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस

व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस

पुणे : तुर्कीने पाकिस्तानचे समर्थन केल्याने आता तुर्कीविरोधात देशभरात 'बॉयकॉट तुर्की' अभियान सुरु झाले आहे. तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची घोषणा झाली आहे. अशात पुण्याच्या व्यापाऱ्यांनी तुर्कीतून आयात केले जाणारे सफरचंद आणणे बंद केले आहे. यामुळे स्थानिक बाजारातून सफरचंद गायब झाले आहेत. ग्राहकांना अद्याप हे सफरचंद काश्मीरमधून येतातय की तुर्कीतून याची माहिती नव्हती, परंतू आता होऊ लागली आहे. पुण्यात जवळपास १००० ते १२०० कोटींची उलाढाल होते, ती थांबविण्यात आली.

 पुण्यातील फळांचे व्यापारी सुयोग झेंडे यांनी तुर्कस्तानच्या फळांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. इथून पुढे तुर्कस्तान मधून कुठलेही फळ मागवणार नसल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली होती. त्यानंतर आता व्यापारी सुयोग झेंडे यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन कॉल येण्यास सुरुवात झाली आहे. सुयोग झेंडे यांना अज्ञात नंबर वरून फोन आले आणि ठार मारण्याची धमकी दिली. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भिक घालू नये, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असे म्हणत व्यापाऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे.  

फडणवीस म्हणाले, मानवतेच्या दुश्मनाला धडा शिकवणे गरजेचे आहे. तुर्कीच्या सफरचंदवर बहिष्कार टाकणाऱ्या व्यापाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. पाकिस्तानात घुसून पाकीस्तान उध्वस्त करणारा आमचा भारत आहे. ते भारताला नखही लावू शकले नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कोणाच्याही पोकळ धमक्यांना भीक घालू नये, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

तुर्की सफरचंदांची मागणी झाली कमी

या बहिष्काराबद्दल पुणे एपीएमसी सफरचंद व्यापारी सुयोग झेंडे म्हणाले होते की, गेल्या काही दिवसांत तुर्की सफरचंदांच्या मागणीत मोठी घट झाली आहे. सामान्य नागरिकही बहिष्कार तुर्की मोहिमेत सामील झाले आहेत आणि तुर्की सफरचंदांऐवजी इतर ठिकाणांहून सफरचंद खरेदी करत आहेत.'

Web Title: Traders should not give in to anyone's threats; we are with you - Devendra Fadnavis