धावायलाही धाप! देशातील प्रत्येकी ३ पैकी फक्त एकच विद्यार्थी तंदुरुस्त, शारीरिक आरोग्य सध्या गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 11:42 IST2026-03-04T11:42:19+5:302026-03-04T11:42:30+5:30
देशातील सुमारे दोन तृतीयांश विद्यार्थी सातत्याने धावणे, उड्या मारणे किंवा हृदय-श्वसन क्षमता वाढवणारे व्यायाम करू शकत नाहीत

धावायलाही धाप! देशातील प्रत्येकी ३ पैकी फक्त एकच विद्यार्थी तंदुरुस्त, शारीरिक आरोग्य सध्या गंभीर
पुणे: देशातील शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीचे चित्र सध्या गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्येक तीन विद्यार्थ्यांपैकी फक्त एकच विद्यार्थी धाप न लागता धावू शकतो, असा निष्कर्ष वार्षिक आरोग्य सर्वेक्षणातून समोर आला आहे. कोव्हीडनंतर काही प्रमाणात सुधारणा दिसत असली तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्यातील मूलभूत उणिवा अजूनही कायम असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
स्पोर्ट्स व्हिलेज एज्यु. स्पोर्ट्स संस्थेने केलेल्या १४व्या वार्षिक सर्वेक्षणात देशातील ११२ शहरांतील ३३३ शाळांमधील १ लाख ४१ हजार ८४० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. २०१० पासून सुरू असलेला हा अभ्यास शालेय विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीवर आधारित सर्वांत व्यापक उपक्रमांपैकी एक मानला जातो. विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता सात निकषांवर तपासण्यात आली. यात बीएमआय, एरोबिक आणि अनएरोबिक क्षमता, अपर व लोअर बॉडी स्ट्रेंथ, कोर स्ट्रेंथ आणि लवचीकता यांचा समावेश होता.
अहवालानुसार, देशातील सुमारे दोन तृतीयांश विद्यार्थी सातत्याने धावणे, उड्या मारणे किंवा हृदय-श्वसन क्षमता वाढवणारे व्यायाम करू शकत नाहीत. एरोबिक फिटनेस कमी असल्यास भविष्यात हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.
बीएमआयच्या बाबतीतही स्थिती चिंताजनक आहे. सुमारे ४० टक्के विद्यार्थी निरोगी श्रेणीबाहेर आहेत. २०२३ मध्ये ५९.१ टक्के विद्यार्थी निरोगी श्रेणीत होते, तर २०२५ मध्ये हे प्रमाण ५९.६ टक्क्यांवर स्थिरावले आहे. म्हणजेच कोविडनंतरच्या काळात फारशी सकारात्मक झेप दिसत नाही. तसेच ४९ टक्के विद्यार्थी अपर बॉडी स्ट्रेंथमध्ये कमी पडत असून, ४४ टक्के विद्यार्थी लोअर बॉडी स्ट्रेंथच्या निकषांपर्यंत पोहोचत नाहीत. वाढलेला स्क्रीन टाइम, ऑनलाईन गेमिंग आणि अभ्यासाबरोबर वाढलेली बसून राहण्याची सवय यामुळे मुलांचे मैदानापासून दूर जाणे हा या स्थितीमागील प्रमुख घटक असल्याचे निरीक्षण आहे.
संस्थेचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सौमिल मुजुमदार यांनी सांगितले, ‘निरोगी जीवनशैलीची पायाभरणी बालवयातच होते. शाळांमधील क्रीडा तास पुरेसे नाहीत, पालक आणि समाजानेही मुलांना सक्रिय राहण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. नियमित मूल्यमापन आणि सामूहिक कृतीशिवाय परिस्थितीत अपेक्षित बदल घडणार नाही.