Pro Kabaddi League 2024: शेवटच्या मिनिटापर्यंत रंगतदार लढत! अखेर तेलुगु टायटन्सची बंगाल वॉरियर्सवर केवळ २ गुणांनी मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 17:26 IST2024-12-08T17:25:42+5:302024-12-08T17:26:25+5:30

शेवटची २ मिनिटे बाकी असताना तेलगू संघाकडे ३१-२८ अशी आघाडी होती, त्यांनी आपली आघाडी कायम ठेवत ३४-३२ ने सामना जिंकला

tight fight until the last minute Finally Telugu Titans beat Bengal Warriors by just 2 pointsin pro kabaddi league | Pro Kabaddi League 2024: शेवटच्या मिनिटापर्यंत रंगतदार लढत! अखेर तेलुगु टायटन्सची बंगाल वॉरियर्सवर केवळ २ गुणांनी मात

Pro Kabaddi League 2024: शेवटच्या मिनिटापर्यंत रंगतदार लढत! अखेर तेलुगु टायटन्सची बंगाल वॉरियर्सवर केवळ २ गुणांनी मात

पुणे: अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत शेवटच्या मिनिटापर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत तेलुगु टायटन्स संघाने बंगाल वॉरियर्स विरुद्ध ३४-३२ असा रोमहर्षक विजय नोंदविला. मध्यंतराला त्यांच्याकडे १६-१५ अशी एक गुणाची नाममात्र आघाडी होती.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत याआधीच्या सामन्यात तेलुगु संघाला पूर्वार्धात सात गुणांची आघाडी घेऊनही युपी योद्धा संघाकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळेच त्यांच्या कामगिरीविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. आतापर्यंत झालेल्या १६ सामन्यांपैकी नऊ सामने त्यांनी जिंकले आहेत. बंगाल वॉरियर्स संघाला आतापर्यंत झालेल्या १५ सामन्यांपैकी केवळ चारच सामने जिंकता आले आहेत, त्यापैकी येथील सामन्यात त्यांनी हरियाणा स्टीलर्स संघावर मात केली होती. या विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला होता.

या दोन्ही संघांमधील आजच्या लढतीत सुरुवातीपासूनच विलक्षण चुरस पाहावयास मिळाली. दोन्ही संघ आघाडी मिळवण्यासाठी प्रयत्न करीत होते तथापि दोन्ही संघांना फार वेळ आघाडी मिळत नव्हती. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आक्रमक चढायांबरोबरच उत्कृष्ट पकडीही केल्या सामन्याच्या दहाव्या मिनिटाला तेलुगु संघाकडे आठ विरुद्ध सात अशी केवळ एक गुणाचे आघाडी होते. त्यानंतर दोन मिनिटांनी त्यांनी १४-१० अशी आघाडी घेतली होती. मात्र हा आनंद त्यांना फार वेळ टिकला नाही. मध्यंतराला तेलुगु संघाकडे १६-१५ अशी केवळ एक गुणाची आघाडी होती.

उत्तरार्धात सुरुवातीपासूनच दोन्ही संघाकडून आघाडीसाठी जोरदार प्रयत्न होत होते. कधी तेलुगु संघाकडे तर कधी बंगाल संघाकडे आघाडी होती. या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी केलेल्या जिद्द व चिकाटी खेळामुळेच सामना विलक्षण रंगतदार झाला. उत्तरार्धातील बाराव्या मिनिटाला बंगाल संघावर लोण नोंदविला गेला. तेथूनच तेलगू संघाला महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. शेवटची दोन मिनिटे बाकी असताना तेलगू संघाकडे ३१-२८ अशी आघाडी होती. त्यांनी आपली आघाडी कायम ठेवत सामना जिंकला त्यावेळी त्यांच्याकडून आशिष नरवाल व कर्णधार विजय मलिक यांनी अनुक्रमे ९ व ११ गुण नोंदविले. बंगाल संघाकडून मनिंदर सिंग याने १४ गुण मिळविले तर मनजितने सात गुणांची कमाई केली.

Web Title: tight fight until the last minute Finally Telugu Titans beat Bengal Warriors by just 2 pointsin pro kabaddi league

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.