मौजेसाठी स्पोर्ट्स बाईक चोरणाऱ्या तीन तरुणांस अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 09:46 PM2019-12-09T21:46:04+5:302019-12-09T21:47:29+5:30

चाेरटे महागड्या स्पाेर्ट्स बाईक चाेरत असल्याने सिंहगड राेडवरील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण हाेते.

Three youths arrested for stealing sports bikes | मौजेसाठी स्पोर्ट्स बाईक चोरणाऱ्या तीन तरुणांस अटक

मौजेसाठी स्पोर्ट्स बाईक चोरणाऱ्या तीन तरुणांस अटक

googlenewsNext

पुणे : सिंहगड रस्ता परिसरासह पुणे शहरात दुचाकी चोरांनी धुमाकूळ घातला होता. महागड्या किंमतीच्या स्पोर्ट्स बाईक चोरी करणाऱ्या तीन तरुणांना सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेऊन दहा स्पोर्ट्स बाईक हस्तगत केल्या आहेत. शुभम राजेंद्र राठोड (वय २१, रा सिद्धिविनायक सोसायटी, फ्लॅट नं ११, जांभुळवाडी, आंबेगाव पुणे) आकाश कैलास देवकाते  (वय २४, रा सदर) व आकाश उर्फ अंश दत्तमिलन घिरटकर (वय २०, रा ऍक्टिव्ह फाउंडेशन बिल्डिंग, जांभुळवाडी, आंबेगाव, पुणे) अशी तीन चोरट्यांची नावे आहेत.

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, गेल्या काही दिवसांपासून सिंहगड रस्त्यावरील विविध भागातून वाहनचोरीच्या  घटना वारंवार घडत असल्याने 'वाहनचोरांनी दिले पोलिसांनाच आव्हान' या मथळ्याखाली दैनिक लोकमत मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दखल घेऊन सिंहगड रस्ता पोलिसांना तातडीने वाहनचोरांना शोधण्याच्या सूचना दिल्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरांनी धुमाकूळ घातला होता. दहा दिवसांत सहा दुचाकी चोरटयांनी गायब केल्या असल्याने एकप्रकारे वाहनचोरांनी पोलिसांनाच 'चॅलेंज' दिले होते. दररोज अथवा एकदिवसाआड वाहनचोरी होत असल्याने नागरिकांसह पोलिसही हतबल झाले होते. काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळूनही पोलिसांना चोर मिळत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये 'वाहनचोरी' चर्चेचा विषय होता. याबाबत सिंहगड रस्ता तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी दिवसरात्र चोरट्यांना शोधण्याचा चंगच बांधला होता. पोलीस कर्मचारी श्रीकांत दगडे व पुरुषोत्तम गुन्ला यांना मिळालेल्या माहितीवरून तसेच सीसीटीव्हीच्या आधारे तीनही चोरटयांना सिंहगड रस्ता पोलिसांनी जेरबंद केले. सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त पी. डी . राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चेतन थोरबोले, उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस कर्मचारीदत्ता सोनवणे, दयानंद तेलंगेपाटील, सचिन माळवे , रफिक नदाफ, योगेश झेंडे, हरीश गायकवाड, बालाजी जाधव, किशोर शिंदे, अविनाश कोंडे, यशवंत ओंबासे, मोहन भरुक , वामन जाधव, राजेंद्र सुर्वे, राहुल शेडगे यांच्या पथकाने केली.    

तीन मिनिटात स्पोर्ट्स बाईकची चोरी; उच्चशिक्षित चोरटे
स्पोर्ट्स बाईकची चोरी करण्याच्या आधी हे चोरटे परिसराची रेकी करीत असता. त्यानंतर बाईकवर पाळत ठेवून संधी साधून तोंडाला रुमाल बांधून फक्त तीन मिनिटाच्या आत दुचाकीचे हॅण्डल लॉक तोडून गाडी सुरु करून घेऊन जात होते. बऱ्याच ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची अशाच प्रकारची दृश्ये पोलिसांनी आढळली होती. शुभम राठोड हा दुचाकी चोरायचा व आकाश देवकाते व अंश घिरटकर त्याला मदत करीत असत.घिरटकर ह्याचे 'सीए' करीत असून बाकी दोनही चोरटे शिक्षण करीत आहेत. त्यांनी चोरलेल्या दहा दुचाकीपैकी तीन दुचाकी परभणी येथे विकल्या होत्या. तर बाकी दुचाकी पुण्यातच मिळून आल्या आहेत. हस्तगत केलेल्या दहा दुचाकीपैकी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ५, भारती विद्यापीठ पोलीस ठाणेच्या हद्दीतून २ तर वारजे, हिंजवडी, लष्कर या पोलीस ठाणे हद्दीतून प्रत्येकी एक दुचाकी अशा एकूण ८ लाख ४० हजार रुपये किमतीच्या स्पोर्ट्स बाईक हस्तगत केल्या आहेत.

Web Title: Three youths arrested for stealing sports bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.