नगर-कल्याण अपघातात तिघांचा मृत्यू; ग्रामस्थ संतप्त, महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 13:48 IST2024-07-19T13:47:25+5:302024-07-19T13:48:20+5:30
महामार्ग प्राधिकरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, ग्रामस्थांचा इशारा

नगर-कल्याण अपघातात तिघांचा मृत्यू; ग्रामस्थ संतप्त, महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
आळेफाटा : नगर-कल्याण महामार्गावर गुळंचवाडी (ता.जुन्नर) शिवारात भीषण अपघात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. बायपास करण्याची वारंवार मागणी करूनही गुळंचवाडी गावावातून महामार्ग गेल्याने अपघात होत असल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी नगर-कल्याण महामार्गावर आंदोलन सुरू केले आहे. महामार्ग प्राधिकरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देत संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर बसले आहे. दोन तासाहून अधिक काळ महामार्ग रोखून धरल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्यासह पोलिस पथक दाखल झाले होते. पोलिसांशी चर्चा करताना ग्रामस्थांनी महामार्ग अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवा, आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. बायपास करण्याची वारंवार मागणी करूनही गुळंचवाडी गावावातून रस्ता केल्याने वारंवार अपघात होवून त्यात ग्रामस्थांचे बळी जात आहेत. त्याला महामार्ग प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे जोपर्यंत महामार्ग प्राधिकरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका मांडली.