Pune Metro: मेट्रोमध्ये गैरवर्तन करणाऱ्यांना बसणार चाप; मार्गांवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष गस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 15:24 IST2025-10-06T15:24:39+5:302025-10-06T15:24:50+5:30
गर्दीच्या वेळी गैरवर्तन, स्थानक परिसरात कचरा टाकणे, मेट्रोत खाद्यपदार्थांचे सेवन, असे विविध प्रकार घडत आहेत

Pune Metro: मेट्रोमध्ये गैरवर्तन करणाऱ्यांना बसणार चाप; मार्गांवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष गस्त
पुणे: मेट्रो प्रवासाच्या सुरक्षिततेला आणि शिस्तीला महत्त्व देत महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) रामवाडी ते वनाझ आणि पिंपरी चिंचवड मनपा ते स्वारगेट या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो गाड्यांमध्ये विशेष गस्त सुरू करण्यात आली आहे. महामेट्रोकडून प्रवाशांना सुरक्षित आणि सुखद प्रवास अनुभवता यावा, यासाठी हा निर्णय घेतला आहे. दोन्ही मेट्रो मार्गिकांवर संबंधित स्थानकांवरील सुरक्षा पर्यवेक्षक आणि त्यांच्यासोबत असलेले सुरक्षा कर्मचारी मिळून ही गस्त घालणार आहेत. यामुळे मेट्रोमध्ये होणारे गैरवर्तन रोखण्यास मदत होणार आहे.
मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सध्या दोन्ही मार्गांवर सव्वादोन लाख प्रवासी प्रवास करत आहेत. गर्दी वाढत असताना गैरवर्तन, स्थानक परिसरात कचरा टाकणे, मेट्रोत खाद्यपदार्थाचे सेवन असे विविध प्रकार घडत आहेत. त्यामुळे महामेट्रोकडून दोन्ही मार्गांवरील स्थानक, मेट्रोमध्ये सुरक्षारक्षकांमार्फत महामेट्रोने गस्त सुरू केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरवर्तन रोखणे, मेट्रो ट्रेनमध्ये आणि स्थानक परिसरात कचरा करणे, मेट्रो ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ खाणे आणि मेट्रो कायद्याशी विसंगत वर्तन थांबवणे याकडे सुरक्षारक्षक लक्ष देणार आहेत. दोन्ही मार्गिकांवर विविध स्थानकांदरम्यान दिवसांतून किमान पाच ते सहा वेळा हे पथक नियमितपणे गस्त घालणार आहे. गस्तीवर असलेले सर्व कर्मचारी हे गणवेशात असणार आहेत. तसेच, त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात पूर्णपणे सतर्क राहतील. या गस्तीदरम्यान कोणीही प्रवासी गैरवर्तन करताना आढळल्यास त्याला मेट्रो नियमांनुसार दंड करण्यात येईल. पण, गैरवर्तन हे कायदा सुव्यवस्थेच्या नियमाच्या आधीन असेल, तर त्या व्यक्तीला संबंधित पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात येईल. पुणे मेट्रो प्रशासनाने या विशेष अभियानामुळे मेट्रोमधील प्रवासादरम्यान शिस्त आणि सुरक्षिततेचे वातावरण अधिक चांगले होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
गर्दीच्या वेळी गैरवर्तन, स्थानक परिसरात कचरा टाकणे, मेट्रोत खाद्यपदार्थांचे सेवन, असे विविध प्रकार घडत आहेत. त्यामुळे महामेट्रोकडून दोन्ही मार्गांवरील स्थानक, मेट्रोमध्ये सुरक्षारक्षकांमार्फत गस्त सुरू केली आहे. गैरवर्तन करताना आढळल्यास त्याला मेट्रो नियमांनुसार दंड करण्यात येईल.- चंद्रशेखर तांबवेकर, अतिरिक्त महासंचालक (जनसंपर्क) महामेट्रो